रिमझिम पावसाने पिके जोमात.. आंतर मशागतींना आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:46+5:302021-07-26T04:20:46+5:30
पाचेगाव : रिमझिम पावसाने नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात खरिपातील सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, बाजरी आदी पिके जोमाने वाऱ्यावर डौलत ...

रिमझिम पावसाने पिके जोमात.. आंतर मशागतींना आला वेग
पाचेगाव : रिमझिम पावसाने नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात खरिपातील सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, बाजरी आदी पिके जोमाने वाऱ्यावर डौलत आहेत. सगळीकडे राने हिरवाईने नटली असून आंतर मशागतींना वेग आला आहे.
सध्या पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील गोणेगाव, इमामपूर, पुनतगाव, निंभारी आदी गावांतील शेतशिवारात पिकाच्या आंतर मशागतीच्या कामांना वेग आला आहे. सर्वत्र शेतकरी, शेतमजूर खुरपणी कामात मग्न असल्याचे दिसते. पिकातील तणाचे प्रमाण वाढल्याने शेतकामासाठी महिला मजुरांची टंचाई जाणवत आहे.
यंदा ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने खरीप पिकाचे लागवड क्षेत्र घटूनही परिसरात शेतमजूर मिळत नाहीत. शेतमजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांनी सायकल आणि बैल डवरणीला पसंती दिली आहे. कपाशी, तूर, मका आदी पिकातही बैलाच्या साहाय्याने आंतर मशागती सुरू आहेत.
खरिपाच्या सोयाबीन, बाजरी, मका, मूग, तूर पिकावर रोगाचा फारसा परिणाम नसला तरी कपाशी पिकावर मात्र मर आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही ठिकाणी विषाणूजन्य रोगांचाही प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी फवारणी करीत आहेत.
घरगुती बियाणे, सततच्या पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन, बाजरी लागवडीचा उतार कमी झाला आहे. अनेक ठिकाणी बराच काळ शेतात पाणी साचून राहिल्याने त्यातील पीक उपडून पूर्णपणे वाया गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकरी उत्पादन घटीचीही चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
---
३७० मिलिमीटर पावसाची नोंद...
पाचेगाव परिसरात आतापर्यंत ३७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिसरात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस नोंदला गेला आहे. त्यामुळे परिसरात पिके जोमात आहेत. असेच चित्र सगळीकडे पहावयास मिळत आहे.
---------
गतवर्षीची पीक नुकसान भरपाई नाहीच..
गत मोसमात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी पीकविमा हप्ता भरूनही अजूनपर्यंत पदरी काहीच पडलेले नाही. गत ऑक्टोबरमध्येही शासनाकडून कपाशी, तूर पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. त्या पीक पंचनामा अहवालाचे पुढे काय झाले, हेदेखील गुलदस्त्यातच आहे.
----------------
२५ पाचेगाव परिसरात सुरू असलेली तुरीची खुरपणी.