श्रीपाद छिंदमविरोधात जबरी चोरी, ॲट्रॉसिटीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST2021-07-17T04:18:17+5:302021-07-17T04:18:17+5:30
छिंदम बंधूंसह त्यांच्या साथीदारांनी ९ जुलै रोजी दुपारी दिल्ली गेट येथे बोडखे यांना जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या ज्युस ...

श्रीपाद छिंदमविरोधात जबरी चोरी, ॲट्रॉसिटीचा गुन्हा
छिंदम बंधूंसह त्यांच्या साथीदारांनी ९ जुलै रोजी दुपारी दिल्ली गेट येथे बोडखे यांना जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या ज्युस सेंटरमधील साहित्य फेकून दिले. यावेळी श्रीपाद छिंदम याने टपरीच्या गल्ल्यातील ३० हजार रुपये हिसकावून बोडखे व त्यांच्या मुलास शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर आरोपींनी बोडखे व त्यांच्या मुलास तेथून हुसकावून देत त्यांची टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून टाकली, असे फिर्यादीत म्हटले आहे. छिंदमसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे यांच्यासह इतर ३० ते ४० जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात विजय रमेश सामलेटी (रा. तोफखाना) यांनी गुरुवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेनेचे नगर दक्षिण उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह त्यांचा भाऊ राजेश जाधव, बाळासाहेब जाधव, चेतन जाधव, भागीरथ बोडखे, प्रतीक बोडखे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. १२ ते १५ जुलै दरम्यान विजय सामलेटी यांच्यासह श्रीपाद छिंदम व त्यांच्या ओळखीचे इतर लोक दिल्लीगेट येथे सामलेटी यांना गाळा भाड्याने घ्यायचा असल्याने तो गाळा पाहण्यासाठी गेले होते. यावेळी गिरीश जाधवसह त्याचे इतर भाऊ व इतर साथीदार त्याठिकाणी आले. यावेळी ते श्रीपाद छिंदम याला म्हणाले, हे गाळे तुम्ही येथे कसे उभे केले, तू मला विचारल्याशिवाय मिळकतीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे नाही. तुला काही बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्यामागे पाच हजार याप्रमाणे १२ गाळ्याचे ६० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. ऐकणार नसाल तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुझा कायमचा बंदोबस्त करू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे करीत आहे.