सावधान... तुमची कारही जाऊ शकते चोरीला
By अण्णा नवथर | Updated: July 8, 2023 16:16 IST2023-07-08T16:13:56+5:302023-07-08T16:16:06+5:30
अहमदनगरमध्ये अशीच एक हॉटेल समोर उभी केलेली कार चोरट्यांनी चोरून नेली.

सावधान... तुमची कारही जाऊ शकते चोरीला
अहमदनगर: शहरासह ग्रामीण भागात मोटारसायकल चोरींच्या घटना घडत असतानाच चोरट्यांनी महागड्या कार चोरण्याकडे माेर्चा वळविला आहे. अहमदनगरमध्ये अशीच एक हॉटेल समोर उभी केलेली कार चोरट्यांनी चोरून नेली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारसह आराेपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून दोन कार हस्तगत करण्यात आल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने चोरीच्या सहा बुलेट हस्तगत केल्याची घटना ताजी असतानाच सापळा लावून कारसह चोरट्याला ताब्यात घेतले आहे. समीर कादीर शेख ( २५, रा. संजयनगर, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात कार चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यातआला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटारसायकल चोरट्यांचा तपास घेत होते. त्याचवेळी पोलिसांना कार चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची गुप्त बातमीदारामाफत माहिती मिळाली.
पोलिसांनी जालना येथे जावून आरोपीस ताब्यात घेऊन कार ताब्यात घेतली. आरोपींनी नाशिक व अहमदनगरमध्ये चोरलेल्या दोन कार त्याच्या साथीदारांच्या घरी लपवून ठेवलेल्या होत्या. त्या त्याने काढून दिल्या असून, दोन्ही कार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरिक्षक सोपान गोरे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, संदीप पवार, रविंद्र कर्डिले, गणेश भिंगारदे आदींच्या पथकाने केली.