बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कानवडे यांच्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:38 IST2021-03-13T04:38:10+5:302021-03-13T04:38:10+5:30
अकोल्यातील अगस्ती डेव्हलपर्स कंपनीचे मालक तथा आर्किटेक्ट लक्ष्मीकांत अंबादास नाईकवाडी (वय ३७) यांच्या राजगुरुनगर (पुणे) व अकोले येथील बांधकाम ...

बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कानवडे यांच्याविरुद्ध गुन्हा
अकोल्यातील अगस्ती डेव्हलपर्स कंपनीचे मालक तथा आर्किटेक्ट लक्ष्मीकांत अंबादास नाईकवाडी (वय ३७) यांच्या राजगुरुनगर (पुणे) व अकोले येथील बांधकाम प्रकल्पाविषयी तक्रारी करून खंडणी मागितल्याची नाईकवाडी यांची फिर्याद आहे. त्यावरून मयूर कानवडे, गणेश कानवडे व सुभाष कानवडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत नाईकवाडी यांनी म्हटले आहे, आपण व मयूर कानवडे पूर्वी एका कंपनीत संचालक होतो. या कंपनीच्या संचालकांत मतभेद झाल्याने हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी लॉ बोर्डाकडे गेले. त्या प्रकरणात कंपनीने काही रक्कम देऊन मला मुक्त केले. त्या कंपनीस अगर संचालकांस माझे काहीही देणे लागत नाही. २०१७ पासून त्या कंपनीपासून मुक्त होत मी अगस्ती डेव्हलपर्स ही संस्था सुरू केलेली आहे. त्या संस्थेमार्फत राजगुरुनगर व अकोले येथे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. मात्र, राजगुरुनगर येथील प्रकल्पाबाबत कानवडे यांनी तक्रारी केल्याने राजगुरुनगर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी मला काम थांबविण्यास सांगितले. तसेच अकोले येथील धुमाळ व नाईकवाडी यांच्या प्रकल्पाबाबतही तक्रारी करून मला त्रास दिला जात आहे. आम्हाला पैसे दिले तर अर्ज मागे घेतो असे म्हणत कानवडे यांनी भाऊपाटील नवले यांच्या जनलक्ष्मी पतसंस्थेत प्रवीण गोडसे, सचिन शेटे, महेश नवले, शिवाजी धुमाळ या मध्यस्थांसमोर पैसे मागितले. यात ठरलेल्या रकमा मयूर कानवडे यांच्या खात्यावर मध्यस्थांच्या साक्षीने जमा करण्यात आल्या.
माझी पत्नी सोनाली हिलाही रस्त्यात अडवून खंडणी मागण्यात आली, अशीही नाईकवाडी यांची तक्रार आहे. या तक्रारीवरून वरील तिघांविरुद्ध अकोले पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने सुरुवातीला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र, नंतर तो रद्द केल्याने न्यायालयाच्या बाहेरच पोलिसांनी गणेश कानवडे यांना अटक केली.