माजी सरपंचाविरुध्द गुन्हा
By Admin | Updated: July 17, 2014 00:30 IST2014-07-16T23:21:02+5:302014-07-17T00:30:32+5:30
तिसगाव : सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी कार्यालयात घुसून दमदाटी व दप्तर फेकून दिल्याप्रकरणी
माजी सरपंचाविरुध्द गुन्हा
तिसगाव : सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी कार्यालयात घुसून दमदाटी व दप्तर फेकून दिल्याप्रकरणी पाथर्डी तालुक्यातील लोहसरचे माजी सरपंच बाळासाहेब खंडू गिते यांच्याविरुध्द पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कामगार तलाठी आर.एस. पारधे यांनी मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
गिते सात बारा उताऱ्यावर नाव लावावे म्हणून वारंवार सांगत होते. परंतुु आवश्यक कागदपत्राशिवाय उताऱ्यावर नाव लावता येत नाही, असे सांगितल्याचा राग येऊन गिते यांनी कार्यालयातील दप्तर फेकून दिले. तसेच शिवीगाळ करुन पाहून घेईन, अशी धमकी दिली, असे तलाठी पारधे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत विद्यमान सरपंच अनिल गिते म्हणाले, दादागिरी व गुंड प्रवृत्ती गावात वाढली असून, विकास कामात त्यामुळे अडथळे येत आहेत. कर्मचाऱ्यांना त्रास होतो. पोलीस अधीक्षकांना तसे निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले.
दुचाकी धडकेत
दोघे गंभीर जखमी
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण-कोपर्डी मार्गावर दोन दुचाकीच्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.
संजय हरिभाऊ सुद्रिक (रा.कोपर्डी) कुळधरणहून दुचाकीवर कोपर्डीकडे जात होते. त्यावेळी रामेश्वर शेषराव सुपेकर (रा.कुळधरण) कोपर्डीमार्गे येत होते.
भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये दोघेही चालक गंभीर जखमी झाले.
या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले. सुपेकर यांना उपचारासाठी दौंड येथे तर सुद्रिक यांना श्रीगोंदा येथे हलविण्यात आले. कुकडी वसाहतीनजीक गतिरोधक बसविला नसल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी कुकडी वसाहतीनजीक तातडीने गतीरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)