मनपा अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:30+5:302021-06-26T04:16:30+5:30

अहमदनगर : शहरात हाती घेण्यात आलेल्या अमृत भुयारी गटार योजनेच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घमासान झाले. ठेकेदाराकडून मलिदा मिळत ...

Corruption allegations against municipal officials | मनपा अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

मनपा अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

अहमदनगर : शहरात हाती घेण्यात आलेल्या अमृत भुयारी गटार योजनेच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घमासान झाले. ठेकेदाराकडून मलिदा मिळत असल्याने अधिकारी त्याला पाठीशी घालतात, असा अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप सदस्यांनी केला. महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही हेच मत मांडल्याने अधिकारी अडचणीत आले आहेत.

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सभा झाली. राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी अमृत योजनेचा मुद्दा उपस्थित केला. या ठेकेदाराने रस्त्यांची अक्षरश: चाळण केली आहे. रस्त्यांतील खड्ड्यांत पडून अनेक जण गंभीर जखमी झाले. मात्र, अधिकारी ठेकेदारावर कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतात, असे ते म्हणाले.

महापौरांनीदेखील ठेकेदाराचा भंडाफोड केला. अमृत योजनेचा ठेकेदार स्वत: कधीच बैठकीला आला नाही. बिल मात्र न चुकता घेऊन जातो. अधिकारीही अशा ठेकेदाराचे बिल काढून देतात, ही बाब गंभीर आहे. जेवढा ठेकेदार जबाबदार आहे, तेवढेच अधिकारीही जबाबदार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असा आदेशच त्यांनी दिला.

आयुक्त शंकर गोरे यांनीही ‘ही वस्तुस्थिती आहे, ठेकेदाराला कदापि पाठीशी घालणार नाही, वेळेत काम पूर्ण केले नाही, तर ठेकेदाराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करू’ असे सांगितल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे उघड झाले आहे. सभापती अविनाश घुले, उपमहापौर मालन ढोणे यांनीही ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. ठेकेदारासोबत सायंकाळी बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे महापौरांनी अखेरीस जाहीर केले. महापालिकेला हरित लवादाने केलेली ४० लाखांच्या दंडाची रक्कम अधिकारी व ठेकेदारांकडून वसूल करा, अशी मागणी सागर बोरुडे यांनी केली. याप्रकरणी अधिकारी जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा, असाही आदेश महापौरांनी दिला. यावेळी सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनी महापौरांच्या कार्यकाळातील कामांची माहिती देत प्रशासनाचे आभार मानले.

........

विद्युत दिव्यांवरून सभा तापली

गतवर्षी सर्व नगरसेवकांना इलेक्ट्रिक कामासाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी दिला होता. मात्र, ठराविक नगरसेवकांच्या प्रभागातच विद्युत दिवे दिले. काहींना काहीच मिळाले नाही, याकडे सेनेचे नगरसेवक दत्ता कावरे यांनी लक्ष वेधले. विद्युत विभागप्रमुख आर. जी. मेहेत्रे यांनी सर्व प्रभागांत दिवे बसविले आहेत, असे उत्तर देताच कावरे चांगले संतापले. ‘हे दिवे मी माझ्या घरी मागत नाही’ असे ते म्हणताच ‘हे दिवे मी माझ्या घरी नेले नाहीत’, असे मेहेत्रे म्हणाले. त्यावर महापौरांनी मेहत्रे यांना तंबी दिली व पुढील काळात हा प्रश्न प्रलंबित राहायला नको, असे सांगितले.

....

प्रेमदान चौकात ठरली महापौरपदाची रणनीती

गतवेळी महापौरपदासाठी राष्ट्रवादीकडे बहुमत नव्हते. भाजपचा महापौर करण्याचे ठरले. आपण स्वत: बाबासाहेब वाकळे यांच्याशी प्रेमदान चौकात चर्चा केली. त्यांनी महापौर हाेण्याची तयारी दर्शविली. अशा पद्धतीने प्रेमदान चौकात बाबासाहेब वाकळे यांच्या महापौरपदाची रणनीती आखली गेल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले यांनी सभागृहात केला.

....

सदस्यांच्या कौतुकाने वाकळे भारावले

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या कार्यकाळातील शुक्रवारी शेवटची सभा होती. या सभेत सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी महापौर वाकळे यांचे तोंडभरून कौतुक केले. काहींनी आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या. सदस्यांकडून होत असलेल्या कौतुकाने वाकळेही भारावून गेले.

Web Title: Corruption allegations against municipal officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.