कोरोना झालाय... इंजेक्शन मिळेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:41+5:302021-07-14T04:23:41+5:30
------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोल रूम सुरू करण्यात आली होती. येथील ...

कोरोना झालाय... इंजेक्शन मिळेल का?
-------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोल रूम सुरू करण्यात आली होती. येथील क्रमांकवर दूरध्वनी करून रुग्णांचे नातेवाईक बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन, लसीकरणाबात चौकशी करायचे. एका दिवसाला दोनशे ते तीनशेच्या वर फोन यायचे. सद्य:स्थितीत दिवसाकाठी एखाद दुसरा फोन येतो. ही संख्या आता शून्यावर येत असल्याचे दिसते.
दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. दिवसाला चार हजार रुग्ण पॉझिटिव्ह यायचे. आता ही संख्या चारशे ते पाचशेपर्यंत खाली आली आहे. मात्र, मार्च ते जून-२०२१ या कालावधीत रुग्णांना बेड मिळत नव्हते. ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांचे फोन यायचे. एकाच दिवशी येणारे फोन हे तीनशेच्या वर असायचे. त्यामुळे कंट्रोल रूममधील कर्मचाऱ्यांच्याही नाकीनऊ आले होते. आलेला प्रत्येक फोन नोंद करताना कर्मचारीही अपुरे पडायचे. मात्र, आता येणाऱ्या फोनची संख्या अत्यंत कमी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने २३४३६०० या क्रमांकावर हेल्पलाइन सुरू केली होती. आताही या क्रमांकावर दिवसाला एक किंवा दोनच फोन येतात. आजही कोरोना झाला आहे. आम्हाला त्यावर काही इंजेक्शन हवे आहे. ते मिळेल का? लसीकरण सुरू आहे का, आज कोणती लस उपलब्ध आहे, अशा प्रकारचे फोन येत असल्याचे कंट्रोल रूमच्या प्रमुखांनी सांगितले.
--------------
औषध मिळत नाही, काय करू?
कोरोना झालेला आहे. सध्या रेमडेसिविरपण दिले जात नाहीत. आता त्यावर दुसरे कोणते इंजेक्शन आहे का? अशीही विचारणा करणारे फोन कंट्रोल रूममध्ये येतात. महापालिकेच्या कंट्रोल रूमवर नळाला पाणी आले नाही, लसीकरण कधी मिळणार आहे, आज कोणती लस उपलब्ध आहे? अशी विचारणा करणारे फोन येतात, तर जिल्हा रुग्णालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कोरोनासाठी बेड उपलब्ध आहे का, ओपीडी सुरू आहे का? याची चौकशी केली जात आहे. एप्रिल ते जून या काळात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होता. त्यामुळे या काळात १,२०० च्यावर चौकशी करणारे, विचारणा करणारे फोन आले होते, असे कंट्रोल रूमच्या प्रमुखांनी सांगितले. कंट्रोल रूमची जबाबदारी जिल्हा निवडणूक शाखेकडे देण्यात आली होती.
----------------
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रोज दोनशेच्या वर फोन येत होते. नंतर ही संख्या कमी- कमी होत गेली. सध्या एक ते दोन फोन येतात. कोरोनावर काही इंजेक्शन मिळेल का, अशीच विचारणा होत आहे. कोरोना कमी झाल्याने आता चौकशी करणाऱ्यांची संख्या शून्यावर आली आहे.
-कंट्रोल रूमप्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालय
---------------
कंट्रोल रूमकडे आलेल्या तक्रारी (एप्रिल ते जूनमधील)
रेमडेसिविर इंजेक्शन - ५००
ऑक्सिजन बेड - ३००
कोविड सेंटर कुठेय - १००
बेड शिल्लकबाबत विचारणा - १५०
म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन - ५०
-------------