कोरोनाने ग्रामीण भागातही केला कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:01+5:302021-04-23T04:22:01+5:30
श्रीरामपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामीण भागालाही यंदा बसला आहे. शहर व ग्रामीणमधील कोरोना बाधित रुग्णांची ...

कोरोनाने ग्रामीण भागातही केला कहर
श्रीरामपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामीण भागालाही यंदा बसला आहे. शहर व ग्रामीणमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सारखीच असल्याचे समोर आले आहे. पहिल्या लाटेमध्ये अनेक खेडे गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते. आता मात्र विषाणू सर्वत्र पोहोचला आहे.
शहर व तालुक्यात दुसऱ्या लाटेत बुधवारअखेर तीन हजार ७४२ रुग्ण मिळून आले. त्यातील एक हजार ८०७ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. शहरातील एक हजार ९३५ रुग्णांचा त्यात समावेश आहे.
संशयितांच्या चाचण्या वेगाने सुरू आहेत. तालुक्यात आतापर्यंत दहा हजार ९२ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. यात जलद चाचण्यांचे प्रमाण ७० टक्के आहे.
धक्कादायक बाब म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग तालुक्यातील सर्वच गावांमध्ये सर्वदूर पोहोचला आहे. अद्यापही अनेक लोक घरीच उपचार घेत आहेत. त्यांची सरकार दरबारी त्यामुळे नोंद होऊ शकलेली नाही.
--------
पॉझिटिव्हिटी दर ३८ टक्के
तालुक्यात झालेल्या दहा हजार चाचण्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या तब्बल ३८ टक्के मिळून आली आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये बेड्स मिळणे अशक्य झाले आहे. ऑक्सिजन व आयसीयू बेड्सचा त्यामुळे तुटवडा झाला आहे.
--------
सर्व १४ रुग्णालये फुल्ल
शहरातील १४ कोरोना समर्पित रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या सर्व ठिकाणी बेड्स पूर्ण क्षमतेने भरले गेले आहे. त्यामुळे नव्या रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे.
---------
४० हून अधिक मृत्यू
तालुक्यातील ४० हून अधिक लोकांचा या लाटेत मृत्यू झाला आहे. मागील लाटेच्या तुलनेत ही आकडेवारी जास्त असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी दिली.
-----------