कोरोनाकाळात क्षयरोग प्रसाराला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:26 IST2021-08-19T04:26:21+5:302021-08-19T04:26:21+5:30

जिल्ह्यात पूर्वी क्षयरोगाचे प्रमाण अधिक होते. दरम्यान राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ते अजूनही जास्तच आहे. परंतु कोरोना काळात आवश्यक ...

Controlling the spread of tuberculosis in the coronal period | कोरोनाकाळात क्षयरोग प्रसाराला लगाम

कोरोनाकाळात क्षयरोग प्रसाराला लगाम

जिल्ह्यात पूर्वी क्षयरोगाचे प्रमाण अधिक होते. दरम्यान राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ते अजूनही जास्तच आहे. परंतु कोरोना काळात आवश्यक ती खबरदारी प्रत्येकांकडूनच घेतली गेल्याने या काळात रोगाचा प्रसार पूर्वीपेक्षा कमी झाला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी औषधोपचारांची काळजी घेतल्याने क्षयरोग बरा होण्याचे प्रमाणही वाढले.

क्षयरोग रूग्णांचे निदान करून याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. जे क्षय रूग्ण उपचार घेत आहेत, त्यांना नि:क्षय पोषण योजनेतून दर महिन्याला ५०० रूपये देण्यात येतात. या रूग्णांना औषधे शासनाकडून मोफत मिळतात. रूग्णांना औषधोपचारासह सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ रूग्णांना उपचार सुरू असेपर्यंत दिला जातो. क्षयरोग अर्थात टीबीच्या रूग्णांना पौष्टिक आणि आरोग्याला लाभदायक आहार घेता यावा यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रति महिना पोषण आहार भत्ता म्हणून ५०० रुपये दिले जातात. मात्र अनेक रूग्णांनी बँक खाते क्रमांक न दिल्याने हा भत्ता त्यांना मिळत नाही.

नगर जिल्ह्यात सध्या २,१४७ क्षयरोग्यांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १,६६८ जणांना प्रति महिना ५०० रूपये पोषण भत्ता दिला जातो. इतरांचे बँक खाते उपलब्ध नसल्याने त्यांना भत्ता मिळत नसल्याचे क्षयरोग कार्यालयाचे म्हणणे आहे.

-------------

जिल्ह्यातील क्षयरोगी - २१४७

५०० रूपये भत्ता किती जणांना मिळतो - १६६८

न मिळणाऱ्यांचे प्रमाण (टक्क्यांत) - २२ टक्के

-----------

टीबीची लक्षणे काय

रात्री येणारा ताप, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे ही टीबीची लक्षणे आहेत. यातील कोणतेही लक्षण आढळून आले तर लगेचच थुंकीची तपासणी करणे आवश्यक आहे.

----------------

जास्तीत जास्त २८ महिन्यांत टीबीमुक्त

टीबीच्या रूग्णांचे वेळीच निदान झाले तर तो रूग्ण सहा महिन्यात पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक आहे. एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे २८ महिन्यांचा कालावधी लागतो.

--------------

कोरोनाच्या काळात क्षयरोग हवेतून पसरण्याचे प्रमाण कमी झाले. कारण अनेकांनी मास्क, तसेच सुरक्षित अंतर राखल्याने हवेतून संसर्ग कमी झाला. परिणामी इतर वर्षांपेक्षा कोरोनाकाळात क्षयरोगी कमी आढळले.

- डाॅ. एस. डी. पोटे, जिल्हा क्षयरोग अधिकारी

Web Title: Controlling the spread of tuberculosis in the coronal period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.