भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:45+5:302021-07-21T04:15:45+5:30
भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारपर्यंत जेमतेम पावसाच्या सरी बरसत होत्या. मध्यंतरी या परिसरात रिमझिम पाऊस पडत होता. ...

भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार
भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारपर्यंत जेमतेम पावसाच्या सरी बरसत होत्या. मध्यंतरी या परिसरात रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकांच्या लागवडी खोळंबल्या होत्या.
रविवारी सायंकाळी पावसाने चांगलाच जोर धरला. रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी सायंकाळपर्यंत कायम होता. डोंगर माथ्यावरून छोट्या-मोठ्या प्रमाणात धबधबे कोसळण्यास सुरुवात झाली आहे. भात खाचरे भरू लागली आहेत.
मुळा खोऱ्यातही रविवारी सायंकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने या भागातही मुळा नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे.
कोसळलेल्या जोरदार पावसाच्या सरींमुळे भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली असून मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत भंडारदरा धरणात ३१६ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा ५ हजार ११८ घनफूट इतका झाला होता तर निळवंडे धरणात ७४ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आल्याने पाणीसाठा १ हजार ५०० दशलक्ष घनफूट इतका झाला होता.