कोरोनाविरोधी लढवय्यांचा काँग्रेसकडून गौरव-बाळासाहेब थोरात : प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 16:44 IST2020-03-26T16:44:07+5:302020-03-26T16:44:52+5:30
कोरोनाविरोधात लढाईत सहभागी असलेले शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी, पोलीस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, फार्मासिस्ट यांच्या कामांचा काँग्रेसने गौरव केला आहे. या सर्वांनीही आपल्या तब्येतीसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्र लिहून केले आहे.

कोरोनाविरोधी लढवय्यांचा काँग्रेसकडून गौरव-बाळासाहेब थोरात : प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन
संगमनेर : कोरोनाविरोधात लढाईत सहभागी असलेले शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी, पोलीस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, फार्मासिस्ट यांच्या कामांचा काँग्रेसने गौरव केला आहे. या सर्वांनीही आपल्या तब्येतीसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्र लिहून केले आहे.
कोरोनाची धग महाराष्ट्रातही येऊन पोहोचली आहे. तुमची, माझी चिंता वाढविणाºया बातम्या सतत कानावर येत आहेत. महाविकास सरकारने पहिल्या दिवसापासून हे संकट गांभीर्याने घेतले आहे. शासकीय सेवेतील विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकारी या लढाईत सामील असलेले असंख्य हात किंबहुना आपण या लढाईतील खरेखुरे सैनिक आहात.
सण-उत्सवांचा, कौटुंबिक सोहळ्याचा आणि आपल्या व्यक्तिगत सुटीचा विचार न करता महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी आपण जोखीम पत्करून काम करीत आहात. महाराष्ट्रावर आलेल्या प्रत्येक संकटाला आपण धीराने सामोरे जातात. धोका पत्करून जनतेच्या पाठिशी उभे राहतात. ही शासनव्यवस्था तुमच्यामुळेच आहे. मला ठाऊक आहे आपलेही कुटुंब काळजीत आहे. मात्र, तरीही ही लढाई लढावीच लागणार आहे. आपल्याशिवाय हे युद्ध जिंकणे शक्य नाही. इतरांच्या आरोग्याची काळजी करताना आपण स्वत:लाही जपावे. मास्कचा वापर करावा. सतत हात धुवावेत. सॅनिटायझरचा उपयोग करावा. बैठका-मदतकार्य करताना तीन फूट अंतर ठेवावे. स्पर्श टाळावा आणि इतरही आवश्यक असलेली काळजी घ्यावी, असे आवाहन थोरात यांंनी केले आहे.
कोरोनाविरुध्द एकजुटीने लढा
आरोग्य, पोलीस आणि महसूल विभागासह सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी गेली आठ दिवस करोनाविरोधातील लढाईत व्यग्र आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि त्यांची टीम, विभागीय आयुक्त दररोज उशिरापर्यंत मैदानात आहेत. या अनपेक्षित लढाईला यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार व त्यांचे सर्व सहकारी हे १८ तास व्यस्त आहेत. तलाठी समाजाला धीर देतो. कोतवाल त्यांना मदत करीत आहेत. तुम्ही घरदार सोडून राज्यासाठी दिवस-रात्र एक करून काम करीत आहात. त्यांचे कौतुक आहे. असेही थोरात यांनी पत्रात नमूद केले आहे.