परस्पर विरोधी आंदोलने

By Admin | Updated: March 9, 2016 00:32 IST2016-03-09T00:24:20+5:302016-03-09T00:32:23+5:30

अहमदनगर : नगर शहरात आंदोलनात निषेध, घोषणाबाजी करीत पोलीस अधिकाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या.

Conflicting protests | परस्पर विरोधी आंदोलने

परस्पर विरोधी आंदोलने

अहमदनगर : मुलीच्या अत्याचार प्रकरणात गुन्हेगारांचे समर्थन करून पीडित मुलीला मारहाण करणारे पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांना तातडीने निलंबित करावे या मागणीसाठी लोकाधिकार आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी नगर शहरात पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन निदर्शने केली. दीड तास चाललेल्या या आंदोलनात निषेध, घोषणाबाजी करीत पोलीस अधिकाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या.
लोकाधिकारचे अरुण जाधव आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला परिसरातील सोळा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत अत्याचार झाले होते. मुलीच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. पीडित मुलीने आधी दिलेला जबाब बदलण्यासाठी तिला मारहाण झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता. दरम्यान, पीडित मुलीने रविवारी (दि. ६) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक सोमवंशी आणि उपनिरीक्षक भरत मोरे यांच्या जाचामुळेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप अरुण जाधव यांनी केला. ते म्हणाले, पोलीस निरीक्षक सोमवंशी यांनी मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका शिक्षकाची पाठराखण करून त्याचे नाव गुन्ह्यातून वगळले. तसेच चारही नराधमांवर कारवाई करण्याऐवजी पीडित मुलीच्या नातेवाईकांना जबाब बदलून देण्यासाठी मारहाण केली. वडाळी (ता. श्रीगोंदा) येथील महिलेच्या विवस्त्र धिंड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासही सोमवंशी यांनी टाळाटाळ केली होती. त्यामुळे सोमवंशी यांची श्रीगोंदा येथून आधी तत्काळ बदली करावी. आरोपींना सहकार्य आणि पोलीस खात्याची बदनामी करणाऱ्या सोमवंशी-मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. सोमवंशी यांच्या बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करून ती सरकारजमा करावी. सोमवंशी यांच्यावर कारवाई झाली नाही तर विधीमंडळाच्या अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरीक्षक अविनाश मोरे, जिल्हा विशेष शाखेचे नितीन चव्हाण, बाळकृष्ण हनपुडे, पुरुषोत्तम चोबे, उपनिरीक्षक गजानन करेवाड, विश्वास काळे, गुन्हे शाखेचे शशिराज पाटोळे यांच्यासह पोलीस कर्मचारी, राखीव दलाचे जवान पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालय परिसरात बंदोबस्तासाठी तैनात होते.
अत्याचार प्रकरणात पीडित मुलीला पोलीस निरीक्षक यांनी मारहाण केल्याबाबतच्या तक्रारीची चौकशी करण्यात येईल. ही जबाबदारी अतिरिक्त अधीक्षक पंकज देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून कोणावरही अन्याय होणार नाही. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीरपणे कारवाई केली जाईल.
-डॉ. सौरभ त्रिपाठी, पोलीस अधीक्षक
गावाची नाहक बदनामी
श्रीगोंदा : तांदळी दुमाला येथील अत्याचार प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून कर्तव्य बजावले आहे. मात्र काही समाजकंटकांनी या प्रकरणाचे चुकीच्या पद्धतीने भांडवल करून जातीय तेढ निर्माण करून पोलिसांना बदनाम केले आहे. हे उद्योग त्यांनी बंद करावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सुमारे चार तास धरणे आंदोलन छेडण्यात आले.
बाबासाहेब भोस म्हणाले, तांदळी येथील पीडित मुलीवर पोलिसांनी दबाव आणला नाही. या प्रकरणातील कुणाला खरं खोटं माहीत नाही, मात्र काहींनी बदनामी आणि जातीयवाद फैलाविण्याचे षड्यंत्र रचले आहे, हे बरोबर नाही. हे प्रकरण हाताळण्यात पोलीस यंत्रणा सक्षम आहे. कोणी चुकीच्या पद्धतीने खतपाणी घालू नये. गायकवाड म्हणाले, पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी हे सर्वांना न्याय देणारे अधिकारी आहेत. काही बाहेरील मंडळींनी सुपाऱ्या घेऊन या प्रकरणाला वेगळा रंग दिला आहे. सोशल मीडियावर तालुक्याची होत असलेली बदनामी थांबविणे आवश्यक आहे. नंदकुमार ताडे म्हणाले, या तालुक्यात सर्व जाती- धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र काहींनी या प्रकरणाचे भांडवल करून आगीत तेल ओतण्याचा दुर्दैवी धंदा हाती घेतला आहे. या आंदोलनात सर्व दलित व राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामील झाले होते. यावेळी मिलिंद दरेकर, मच्छिंद्र सुद्रिक, संतोष इथापे, भैय्या वाबळे, गंगाराम दरेकर, सतीश पोखर्णा, चंदन घोडके, नंदकुमार ससाणे यांची भाषणे झाली. हरिदास शिर्के, विलास वाबळे, प्रशांत दरेकर, टिळक भोस व महिला उपस्थित होत्या.
गावाची बदनामी थांबवावी
तांदळी गावाने दलितांवर कधीही अन्याय केला नाही. चुकीचे कृत्य करणाऱ्या आरोपींना आम्ही कधीच पाठीशी घातले नाही. मात्र आमच्या गावाची होत असलेली बदनामी थांबवावी.
-निर्मला शेळके, सरपंच, तांदळी

Web Title: Conflicting protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.