प्रारूप मतदार यादीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:19+5:302021-03-06T04:20:19+5:30
जामखेड : नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीत एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्याचे प्रकार झाले आहेत. याबाबत माजी ...

प्रारूप मतदार यादीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार
जामखेड : नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीत एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्याचे प्रकार झाले आहेत. याबाबत माजी नगरसेवकांनी नातेवाईक व जवळचे मित्र प्रभागात घेऊन वर्चस्व निर्माण होईल या दृष्टीने प्रयत्न केले आहेत, अशी तक्रार जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी राज्य निवडणूक आयुक्त बलदेव हरपालसिंग यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे उगले यांनी हरपालसिंग यांची भेट घेऊन निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी याच मुद्द्यावर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
नगर परिषद निवडणूक निमित्त प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. यासाठी २ हजार ६७ हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींचे निराकरण करण्यासाठी प्रशासक तथा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी २१ प्रभागात तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद कर्मचारी व मतदार केंद्र प्रतिनिधी यांची नियुक्ती करून २५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. यावेळी अनेक इच्छुकांनी प्रशासक व मुख्याधिकारी यांना स्पॉट पंचनामा करून ज्या प्रभागात मतदार राहील त्याच प्रभागात मतदानाचा अधिकार राहील अशी विनंती केली होती. परंतु, अनेकांचे समाधान झाले नव्हते. त्यातच राज्य सरकारने सदर हरकती निकाली काढण्यासाठी व कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता १ मार्च रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी १५ मार्चपर्यंत कालावधी वाढविला.
प्रशासक व मुख्याधिकारी यांच्याकडून म्हणावा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने राज्य निवडणूक आयुक्त बलदेव हरपालसिंग यांना जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी मुंबई येथील कार्यालयात जाऊन निवेदन दिले. मुख्याधिकारी व नगर परिषद कर्मचारी यांनी अंतिम नकाशाप्रमाणे प्रारूप मतदार यादी तयार केली नाही. २ हजार ६७ हरकती आल्या आहेत. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात आली आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे जो व्यक्ती ज्या प्रभागात राहतो त्याचे मतदान त्याच प्रभागात पाहिजे. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने संबंधित अधिकारी यांना योग्य सूचना कराव्यात. दोषी अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावेत व प्रभाग नकाशाप्रमाणे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी राहुल उगले यांनी केली.
---
नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय याद्यांमध्ये मोठा घोळ आहे. कुटुंबातील व्यक्ती वेगवेगळ्या प्रभागात आहेत. अंतिम मतदार यादी नकाशाप्रमाणे नसेल तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
-राजेंद्र कोठारी,
प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी
---
०५ जामखेड पालिका
जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी मुंबई येथे राज्य निवडणूक आयुक्त बलदेव हरपाल यांची भेट घेऊन निवेदन दिले.