खरवंडी कासार : १ ते ९ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे खरवंडी कासार (ता. पाथर्डी) परिसरातील गावांमधील खरीप हंगामातील पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा परिसरातील सरपंच, उपसरपंच, शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार शाम वाडकर यांना देण्यात आले.
अतिवृष्टीने खरवंडी कासार परिसरातील मूग, उडीद, बाजरी, तूर, कपाशी, सोयाबीन या पिकांची नासाडी झाली. ७० टक्के जमिनीमध्ये पाणी साचून सर्व पिके सडली आहेत. बऱ्याच जमिनीतील पिके वाहूनही गेली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच या भागातील शेतकरी ऊसतोडणी कामगार आहे. त्यामध्ये असे अस्मानी संकट आल्याने त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यात बरीचशी कुटुंबं उद्ध्वस्त झाली. त्यामुळे येथील शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा परिसरातील खरवंडी, काटेवाडी, ढगेवाडी, तुळजवाडी, भालगाव, मिडसांगवी या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांनी दिला आहे.
निवेदनावर सरपंच प्रदीप पाटील, भाऊसाहेब सांगळे, गणेश जगताप, योगेश अंदुरे, भास्कर कराड, धनंजय पठाडे, माउली सूळ, नामदेव हजारे, पाराजी सूळ, प्रदीप केळगंद्रे आदींच्या सह्या आहेत.