ओढे, नाल्यांतील अतिक्रमणे हटविण्याचा आयुक्तांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:54 IST2019-07-31T15:52:12+5:302019-07-31T15:54:19+5:30
शहरासह उपनगरातील ओढे व नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात बाधा आणणारी पक्की अतिक्रमणे तातडीने हटविण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी बुधवारी संबंधितांना दिला़

ओढे, नाल्यांतील अतिक्रमणे हटविण्याचा आयुक्तांचा आदेश
अहमदनगर : शहरासह उपनगरातील ओढे व नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात बाधा आणणारी पक्की अतिक्रमणे तातडीने हटविण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी बुधवारी संबंधितांना दिला़
शहरात पडलेल्या पावसाचे पाणी मध्यंतरी नागरिकांच्या घरात घुसले होते़ पावसाचे पाणी घरात घुसून सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले़ पुन्हा तशी परिस्थिती उदभवू नये, यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलावीत, अशी नगरसेवकांची मागणी होती़ या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त भालसिंग यांनी गेल्या आठवड्यात सावेडी उपनगरातील नरहरीनगर, नंदनवन वसाहत, निर्मलनगर, गावडे मळा, कैलास हाऊसिंग सोसायटी आदी भागात पाहणी केली़ या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी ओढे बुजवून त्यावर पक्के बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते़ त्याचा अहवाल अतिक्रमण विभागाने आयुक्तांना सादर केला़ त्याआधारे आयुक्तांनी नगररचना विभागाने नैसर्गिक ओढे व नाल्यांना बाधा आणाणारे रेखांकन दुरुस्त करण्याची कार्यवाही करावी, नव्याने परवानगी देताना ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा येणार नाही, याची खात्री करावी, बांधकाम विभागाने मोठ्या नाल्यांचे पिचिंग काम सुरू करावे, तसेच ज्या ठिकाणी पाईप टाकून ओढे नाले बंदिस्त करण्यात आले आहेत, अशा ठिकाणचे पाईप काढून प्रवाह मोकळा करण्याच्या सूचना केल्या आहेत़ याशिवाय शहरासह उपनगरांत ओढे व नाल्यांतील पक्की अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ संबंधित विभागांनी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत़