नगरमध्ये मतदानासाठी आल्या ११,६९५ शाईच्या बाटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 15:43 IST2019-10-15T15:42:03+5:302019-10-15T15:43:27+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई येथील प्रिंटींग प्रेसमधून ११ हजार ६९५ शाईच्या बाटल्या जिल्ह्यासाठी पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदारांच्या बोटावर ही शाई लावण्यात येणार आहे.

नगरमध्ये मतदानासाठी आल्या ११,६९५ शाईच्या बाटल्या
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई येथील प्रिंटींग प्रेसमधून ११ हजार ६९५ शाईच्या बाटल्या जिल्ह्यासाठी पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदारांच्या बोटावर ही शाई लावण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे सहा दिवस उरले आहेत. २१ आॅक्टोबर रोजी मतदान असून त्यादृष्टीने प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. यानिमित्त निवडणूक आयोगाकडून सर्व साहित्य जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. आवश्यक स्टेशनरी, फिलिंग पेपर, फक्की, ईव्हीएम मशीनसाठी लागणारे कव्हर, तसेच मतदारांच्या हाताला लावण्यात येणारी शाई आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. आलेले हे सर्व साहित्य १२ मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिका-यांकडे पाठविण्यात आले आहे.
मतदान केल्यानंतर मतदारांच्या तर्जनीवर (अंगठ्याशेजारचे बोट) निळी शाई लावण्यात येते. जिल्ह्यात ३ हजार ७२२ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक बूथवर तीन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. एका बाटलीत १० मिली निळी शाई असते. एका बाटलीत किमान ३५० मतदारांना पुरेल एवढी शाई असते. यासाठी मुंबईहून ११ हजार ६९५ (११ लिटर) शाईच्या बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. बोटावर लावलेली शाई कमीत कमी महिनाभर पुसली जात नाही. या शाईमुळे बोगस मतदानाला आळा बसला आहे.
१९६२ च्या निवडणुकीत पहिल्यांदा शाईचा वापर
देशात सर्वप्रथम १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात आली होती. तेव्हापासून सर्व निवडणुकीत शाईचाच वापर करण्यात येत आहे. खास मतदानावेळी वापरण्यात येणारी शाई म्हैसूर येथील एका कंपनीमध्ये तयार करण्यात येते. भारतात उत्पादित या शाईचा वापर २५ देश त्यांच्या निवडणुकीत करतात.
बोटावर शाईने आखली जाते उभी रेषा
२००४ मधील निवडणुकीच्या वेळी मतदान करणा-या मतदारांच्या बोटावर निळ्या शाईचा केवळ एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र २००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी उभी रेषा आखण्याचे निर्देश दिले. अर्ध्या नखावर व अर्ध्या बोटाच्या कातडीवर अशी रेषा मारली जात आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या प्रमाणात शाई जास्त लागते.