अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी ४९९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. नगर शहरात फक्त १० रुग्ण आढळले. त्यामुळे अहमदनगर शहर लवकरच कोरोनामुक्त होईल, असे दिसते आहे. सर्वच तालुक्यातील बुधवारची रुग्णसंख्या ६०च्या आत आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची एकूण संख्याही आता ५ हजार ८१ इतकी खाली आली आहे.
जिल्ह्यात बुधवारी ८१८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६० हजार ९१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७९ टक्के इतके झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १७१ आणि अँटिजन चाचणीत ३०९ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये संगमनेर (६१), पाथर्डी (५७), अकोले (५६), जामखेड (४६), पारनेर (४४), श्रीगोंदा (४२), नेवासा (३८), राहाता (३५), श्रीरामपूर (३३), कर्जत (१५), राहुरी (१५), नगर ग्रामीण (१२), शेवगाव (१२), कोपरगाव (११), नगर शहर (१०), भिंगार (६) येथील रुग्णांचा समावेश आहे.
नगर शहरामध्ये १ जूनला ३६, २ जूनला ५४, ४ जूनला ४४, ६ जूनला ४५, ७ जूनला ३४, ८ जूनला २२, ९ जूनला फक्त १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
---
४० जणांच्या मृत्यूची नोंद
जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर एकाच दिवसात ४० कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हे मृत्यू आठवडाभरातील असले तरी दररोज सरासरी २० ते २५ जणांच्या मृत्यूची नोंद होत असल्याचे दिसते आहे. ८ जूनच्या पत्रकात एकूण मृत्यूची संख्या ३५३१ इतकी होती. ती संख्या ९ जून रोजी ३५७१ इतकी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ४० जणांच्या मृत्यूची नोंद एकाच दिवसात झाली आहे.
---------------
बरे झालेली रुग्णसंख्या : २,६०,९१०
उपचार सुरू असलेले रुग्ण : ५०८१
मृत्यू : ३५७१
एकूण रुग्णसंख्या : २,६९,५६२