जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष मुंबईतच ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST2021-03-01T04:24:00+5:302021-03-01T04:24:00+5:30

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत पडद्याआडून घडामोडी सुरू आहेत. मात्र, याबाबतचा निर्णय मुंबईत घेतला ...

The chairman and vice-chairman of the district bank will be in Mumbai | जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष मुंबईतच ठरणार

जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष मुंबईतच ठरणार

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत पडद्याआडून घडामोडी सुरू आहेत. मात्र, याबाबतचा निर्णय मुंबईत घेतला जाणार असून, अधिवेशनादरम्यान तिन्ही मंत्र्यांची बैठक होऊन अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे संचालकांची मुंबईवारी निश्चित असल्याचे बोलले जाते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी येत्या शनिवारी निवडणूक होत आहे. दरम्यान, सोमवारपासून अधिवेशनाला मुंबईत सुरुवात होत आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार पुढील आठवडाभर मुंबईत असणार आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीबाबत अधिवेशनादरम्यानच बैठक हाेईल. बँकेच्या महाविकास आघाडीच्या संचालकांना मुुंबईत बोलावून तिथेच अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा निर्णय होईल. निवडणुकीच्या दोन दिवस आधी म्हणजे गुरुवारी ही बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रधारांकडून देण्यात आली.

जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक संचालक निवडून आलेले आहेत. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे, हे सूत्र जवळपास निश्चित असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादीकडून श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप व चंद्रशेखर घुले यांच्या नावाची चर्चा आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी सध्या तरी ही दोनच नावे चर्चेत आहेत. यापैकी घुले हे अनुभवी आहेत. माजी आमदार जगताप पहिल्यांदा संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. घुले चौथ्यांदा बँकेवर संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. पण, ऐनवेळी अध्यक्षपदासाठी कोणता निकष लावला जातो, यावर बरेच काही अवलंबून आहे.

....

भाजपच्या संचालकांना शनिवारचा निराेप

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीत जोरबैठका सुरू आहेत. भाजपचे संख्याबळ कमी असल्याने बहुमताचा जादुई आकडा गाठणे त्यांच्यासाठी कठीण आहे. असे असले तरी भाजपच्या सर्व संचालकांना शनिवारी सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचा निरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी धाडला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी भाजपचे सर्व संचालकही नगर शहरात उपस्थित असणार आहेत.

...

जगतापांकडून मोर्चेबांधणी

माजी आमदार राहुल जगताप यांच्या कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ येत्या मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जाणार आहे. यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी जगताप यांची निवड करावी, अशी मागणी शिष्टमंडळाकडून केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: The chairman and vice-chairman of the district bank will be in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.