अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 08:41 IST2025-04-23T08:41:11+5:302025-04-23T08:41:36+5:30
चोंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू होती.

अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त २९ एप्रिल रोजी चोंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक होणार होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २४ एप्रिल रोजी मुंबई दौरा असल्याने चोंडीतील बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे २९ एप्रिल ऐवजी ६ मे रोजी बैठक होणार आहे.
जिल्हा प्रशासनाची चोंडी येथील बैठकीसाठी युद्धपातळीवर तयारी सुरू होती. बैठकीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी विभागनिहाय बैठक घेऊन अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटपही केले होते. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील तयारीचा आढावा घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिलपासून मुंबईत सुरू होणाऱ्या इंडिय स्टील-२०२५ कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात विविध व्यावसायिक, उद्योगपती आणि राज्याचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी, इतर देशांचे प्रतिनिधी मंडळ आदी सहभागी होणार आहेत. त्यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मंत्रिमंडळ बैठकीत विकासाला मिळेल चालना
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ला संवर्धन, श्रीगोंदा येथील पेडगाव किल्ला येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक, जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा या विषयांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.