प्रचाराच्या धुराळ््यात हरवली सीटी बस

By Admin | Updated: October 3, 2014 23:54 IST2014-10-03T23:54:48+5:302014-10-03T23:54:48+5:30

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धुराळ््यात शहर बस सेवा हरवली आहे.

The bus hit the campaign bus | प्रचाराच्या धुराळ््यात हरवली सीटी बस

प्रचाराच्या धुराळ््यात हरवली सीटी बस

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धुराळ््यात शहर बस सेवा हरवली आहे. शहर बस सुरू करण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. आता दोन्हीही पक्षांना शहर बसचा विसर पडला असल्याने नागरिकांचे सध्या हाल सुरू असून पॅगो रिक्षाचालकांच्या आडदांडपणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेची शहर बस सेवा बंद पडली होती. मनसेच्या ताब्यातील स्थायी समितीने शहर बस सेवेच्या ठेकेदाराचा प्रस्ताव फेटाळल्याने बस बंद झाली. त्यामुळे शिवसेनेला आयतेच कोलीत मिळाले. सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे शहर बस सेवा बंद झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. शेवटी महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी कशीबशी जुन्याच ठेकेदाराच्या बस घेऊन नव्या ठेकेदाराच्या नावे बस सुरू केल्या. शहरासाठी किमान ३० बस हव्या असताना चार-पाच बसेसवरच ही सेवा सुरू झाली. ही सेवाही आता बंद पडली आहे. शहर बसवरून दोन्ही पक्षांमध्ये महिनाभरापूर्वी आरोप-प्रत्यारोप सुरू होते. आता मात्र प्रचारामध्ये दोन्ही पक्षांना शहर बस सेवेचा विसर पडलेला दिसतो आहे.
शहर बस बंद असल्याने पॅगो रिक्षाचालकांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली की पुन्हा राजकीय नेते कारवाईमध्ये अडथळे उभे करीत आहेत. प्रवाशांची आर्थिक लूट करणे, अव्वाच्या सव्वा भाडे लावणे, एकाच रिक्षामध्ये अनेक प्रवासी भरणे यामुळे शहरातील प्रवास धोकेदायक बनला आहे. दिल्लीगेट, जुने बसस्थानक, पुणे बसस्थानक येथे पॅगो रस्त्यावरच आडव्या लावल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे.
विनापरवाना रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात आहे. कोणीही हस्तक्षेप केला तरी कारवाई थांबविली जाणार नाही, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे शहर बससेवेचा उपप्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना नसल्याने नव्या ठेकेदाराला बस चालविणे अशक्य झाले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा सुरू असल्याने राजकीय नेत्यांना बस सेवेचा विसर पडला आहे. तिसरीकडे विनापरवाना रिक्षांवर पोलिसांकडूनही सबुरीने कारवाई सुरू आहे. त्यामध्ये सध्या कोणताही आक्रमकपणा नाही. निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक कारवाई टाळल्याचे दिसते आहे. काहीही झाले तरी शहरातील प्रवाशांचे हाल मात्र सुरूच आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: The bus hit the campaign bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.