ऑनलाईन झटपट कर्जाचे फुटले पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:16 IST2020-12-26T04:16:38+5:302020-12-26T04:16:38+5:30

श्रीरामपूर : झटपट आणि सुलभरित्या मिळणा-या आॅनलाईन कर्जाच्या अप्लीकेशनचे छोटी शहरे आणि ग्रामीण भागात पेव फुटले आहे. केवळ आधारकार्डच्या ...

Bursting wave of online instant loans | ऑनलाईन झटपट कर्जाचे फुटले पेव

ऑनलाईन झटपट कर्जाचे फुटले पेव

श्रीरामपूर : झटपट आणि सुलभरित्या मिळणा-या आॅनलाईन कर्जाच्या अप्लीकेशनचे छोटी शहरे आणि ग्रामीण भागात पेव फुटले आहे. केवळ आधारकार्डच्या मोबदल्यात दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत हे कर्ज मिळते. मात्र कर्जदाराचा मोबाईल डेटा हॅक करून वसुलीसाठी त्याच्या संपर्कातील लोकांना कंपन्यांकडून धमक्या देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

गुगल प्ले स्टोअरमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर कर्ज वितरण करणार्या शंभर ते दीडशे कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्या कोणत्याही अर्जदाराला केवळ पॅनकार्ड अथवा आधारकार्डवर कर्ज पुरवठा करतात. त्यामुळे विशेषकरून तरुण वर्ग हे कर्ज उचलत आहे. मात्र प्ले स्टोअरमधून कंपन्यांचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी संपूर्ण मोबाईल डेटा हॅक केला जातो. त्यामुळे मोबाईलमधील यादीच कंपनीला मिळते. कर्जदाराने जर दिलेल्या मुदतीत व्याजासह पैसे भरले नाहीत, तर कंपनीला ही संपर्क यादी कामी येते. कॉल सेंटरमधून कर्जदाराचे मित्र अथवा नातेवाईकांना भरमसाठ कॉल्स सुरू होतात आणि त्यांना धमक्याही दिल्या जातात. संपकार्तील मंडळींना अगोदर या प्रकरणाचा उलगडाच होत नाही. नंतर मात्र कर्जदार आणि या मंडळींत वादावादीचे प्रकार घडतात.

------

असे मिळते कर्ज

नाव, पत्ता आणि आधारचे छायाचित्र वेबसाईटवर भरल्यानंतर कंपनी पाच मिनिटात बँक खात्यावर पैसे जमा करते. कर्जफेडीसाठी सात किंवा पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर मात्र कॉल सेंटरकडून फोन सुरू होतात.

------

२५ ते ३० टक्के व्याज

दोन हजार रुपये कर्जावर ५०० रुपयांचे व्याज अकारले जाते (आठ दिवसांसाठी). मुदतीत पैसे भरले नाही तर दिवसाला १५० ते २०० रुपये दंड ठोठावला जातो. एवढ्यावरच न थांबता कर्जदाराच्या मित्र व नातेवाईकांना अर्वाच्य भाषा वापरून धमकावले जाते.

------------

आरबीआयचे आवाहन

रिझर्व्ह बँकेने नागरिकांना डिजिटल माध्यमांवरील कर्ज घेऊ नये असे आवाहन केले आहे. कंपन्यांकडून कोणाची पिळवणूक होत असल्यास बँकेच्या संकेतस्थळावर आॅनलाईन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

-----------

Web Title: Bursting wave of online instant loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.