आरोग्य प्रबोधन उपक्रमासाठी दीड कोटीचे बजेट-कुलगुरू
By Admin | Updated: September 30, 2014 23:19 IST2014-09-30T23:00:27+5:302014-09-30T23:19:57+5:30
अहमदनगर : मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी विद्यापीठाने दीड कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे कुलगुरू डॉ़ वासुदेव गाडे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले़

आरोग्य प्रबोधन उपक्रमासाठी दीड कोटीचे बजेट-कुलगुरू
अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातंर्गत शिक्षण घेणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी विद्यार्थिनी आरोग्य प्रबोधन उपक्रम राबविण्यात येणार असून, यासाठी विद्यापीठाने दीड कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे कुलगुरू डॉ़ वासुदेव गाडे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले़
पुणे विद्यापीठातंर्गत पुणेसह अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील ९३५ महाविद्यालयात साडेतीन लाख विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत़ या सर्व विद्यार्थिनींना या उपक्रमाचा लाभ मिळणार असल्याचे कुलगुरू डॉ़ गाडे यांनी सांगितले़ हा उपक्रम तालुका व जिल्हापातळीवर स्वतंत्रपणे राबविण्यात येणार असून, विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येणार आहे़ ९ पेक्षा कमी हिमोग्लोबीन असलेल्या विद्यार्थिनींना रक्त वाढीच्या गोळ्या मोफत देण्यात येणार आहेत़
तसेच या उपक्रमांतर्गत प्रत्येक महाविद्यालयात आहारशास्त्र, स्वच्छता, मानसिक औदासिन्य, ताणतणाव याचे व्यवस्थापन, स्त्रियांच्या विषयांच्या कायद्याची ओळख, स्वसंरक्षण आदी विषयांबाबत वर्षभर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे़ आरोग्य चांगले असेल आणि कुठलाही ताणतणाव नसेल तर विद्यार्थिनींचे अभ्यासात लक्ष लागते़ म्हणूनच विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुलगुरू म्हणाले़ दरम्यान कुलगुरू यांच्या हस्ते न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात विद्यार्थिनी आरोग्य प्रबोधन उपक्रमाचे उद्घाटन झाले़ यावेळी विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक व्ही़बी़ गायकवाड, विद्या गारगोटे, युवराज नरवडे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)