आचारसंहिता संपताच अर्थसंकल्पीय सभा
By Admin | Updated: March 27, 2023 10:13 IST2014-05-08T01:01:20+5:302023-03-27T10:13:25+5:30
अहमदनगर: महापालिका अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या महासभेला काही केल्या मुहूर्त मिळेना.

आचारसंहिता संपताच अर्थसंकल्पीय सभा
अहमदनगर: महापालिका अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या महासभेला काही केल्या मुहूर्त मिळेना. अजूनही अर्थसंकल्प प्रशासनाच्या ताब्यात आहे. आचारसंहिता संपताच अर्थसंकल्पीय सभा बोलविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आर्थिक वर्ष (मार्च) संपण्यापूर्वी अर्थसंकल्प मंजूर होणे अपेक्षित असते. स्थानिक स्वराज्य संस्थेचे मंजुरीचे अधिकार हे महासभेला असतात. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे अर्थसंकल्प मंजुरीविनाच राहिला. तातडीचा खर्च आयुक्तांच्या अधिकारांतर्गत केला जात आहे. जमा-खर्चाच्या ताळेबंदाला महासभेची परवानगी आवश्यक असल्याने अर्थसंकल्पाला मंजुरी आवश्यक आहे. आचारसंहिता सुरू असल्याने महासभा होऊ शकलेली नाही.मार्च उलटून गेल्याने करात कोणताच बदल करता येणार नाही, पण कोणत्या बाबीवर किती खर्च करायचा,याची चर्चा महासभेत चर्चा होणार आहे. विरोधी पक्ष नेते पदाची निवडही आचारसंहितेमुळे लांबणीवर पडली आहे. सेनेने नगरसेवक दिलीप सातपुते यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करावी असे पत्र महापौर संग्राम जगताप यांना दिलेले आहे. आचारसंहिता असल्याने जगताप यांनी विरोधी पक्ष नेता नियुक्तीचे पत्र अद्यापतरी कोणाला दिलेले नाही. विरोधी पक्ष नेता कोणाला करायचे याचा अधिकार महापौरांना आहे. आचारसंहिता असल्याचे सांगत त्यांनीही विरोधी पक्ष नेतेपदाचे पत्र देणे टाळले आहे.