अहमदनगर : येथील बूथ हॉस्पिटलला मुंबई येथील बॉम्बे टिन चॅलेंज या सामाजिक संस्थेकडून सात लाख रुपयांची विविध उपकरणे भेट देण्यात आली. ही यंत्रे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, संस्थेच्या पदाधिकारी शोभना कासेल्ला (पेंटा), माजी नगरसेवक संजय चोपडा, जयंत येलुलकर, विनोद पेंटा, संजय ढोणे, बूथ हॉस्पिटलचे प्रशासनाधिकारी मेजर देवदान कळकुंभे आदी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, बूथ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मानवतेच्या भूमिकेतून केलेली रुग्णांची सेवा माणुसकीचे दर्शन घडविणारी आहे. बॉम्बे टिन चॅलेंजचे संस्थापक के. के. देवराज यांनी दिलेली यंत्रसामुग्री रुग्णांसाठी कायमस्वरुपी उपयोगी पडेल.
महापौर वाकळे म्हणाले, मूळच्या नगरच्या असलेल्या शोभना कासुल्ला (पेंटा) यांनी आपली जन्मभूमी असलेल्या नगर शहरासाठी केलेली मदत कौतुकास्पद आहे.
विनोद पेंटा म्हणाले, बहीण शोभना हिचा मुंबईहून संस्थेच्या वतीने मदत कुठे करावी, असा जेव्हा निरोप आला. तेव्हा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी बूथ हॉस्पिटलला मदत करण्याचे सुचविले. त्यामुळे ही मदत करण्याची भावना खऱ्या अर्थाने फलद्रूप झाली.
प्रशासनाधिकारी मेजर देवदान कळकुंभे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी परेश कासूल्ला, नेहा उपलप, विनीत पेंटा, साहिल पेंटा, यश उपलप यांनी परिश्रम घेतले.