घाटघरला धुवाँधार; आंबित धरण ओव्हरफ्लो
By Admin | Updated: July 13, 2014 00:18 IST2014-07-12T23:40:16+5:302014-07-13T00:18:56+5:30
राजूर/अकोले : भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पावसाचे आगमन झाले. भंडारदरा पाणलोटातील घाटघर येथे सुमारे सहा इंच पावसाची नोंद झाली, तर मुळा खोऱ्यातील आंबित धरण ओव्हरफ्लो झाले.
घाटघरला धुवाँधार; आंबित धरण ओव्हरफ्लो
राजूर/अकोले : भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पावसाचे आगमन झाले. भंडारदरा पाणलोटातील घाटघर येथे सुमारे सहा इंच पावसाची नोंद झाली, तर मुळा खोऱ्यातील आंबित धरण ओव्हरफ्लो झाले. तालुक्यातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे.
या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दीर्घ विश्रांती घेतली होती. मात्र शुक्रवार रात्रीपासून या परिसरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. भंडारदरा येथे रात्री पाच तासात तब्बल ४८ मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या दोन दिवसांपासून या पाणलोट क्षेत्रात पावसाचे वातावरण निर्माण होत होते मात्र पाऊस होत नव्हता. पावसाचा मोसम सुरू होऊन एक महिना संपलेला असतानाही पावसाची झड या परिसरात झालीच नाही, तर घाटघरला साजेसा पाऊसही झालाच नव्हता. शुक्रवारी रात्री मात्र जोरदार पावसाचे येथे आगमन झाले व जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून समजल्या जाणाऱ्या घाटघर येथे सुमारे सहा इंच म्हणजेच १४८ मिमी पावसाची नोंद झाली. याबरोबरच पांजरे येथे ८२ मिमी आणि रतनवाडी येथे ७१ मिमी पावसाची नोंद झाली. धरणाच्या पाणलोटात जोरदार सरी बरसल्यामुळे भंडारदरा धरणात प्रथमच नव्याने येणाऱ्या पाण्यात वाढ झाली. सायंकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत भंडारदरा धरणात १६६ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे भंडारदऱ्यातएकूण पाणीसाठा ६२९ दलघफू झाला होता. मात्र सुरू झालेल्या पावसात सातत्य राहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुळा खोऱ्यातीलहरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असणारे १९२ दलघफू क्षमतेचे आंबित हे छोटे धरण पहाटे पाच वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले.
मागील वर्षी हे धरण १६ जूनलाच ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे तुलनेने महिनाभराच्या अवधीनंतर हे धरण पूर्ण क्षमतेने भरले.
खालील भागातील पाणी टंचाई लक्षात घेता पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी या धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर आंबित धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, ओव्हरफ्लोसह या धरणातून २० क्युसेक्सने पाणी नदी पात्रात पडत आहे, अशी माहिती सहायक अभियंता किरण देशमुख यांनी दिली. (वार्ताहर)
गुरुवारी घाटघर ४४, रतनवाडी २८, पांजरे १८ व भंडारदरा २ मिलीमिटर पाऊस पडला. शुक्रवारी घाटघर- १४८, रतनवाडी- ७१, पांजरे- ८२,वाकी-२१, कोतूळ- १०, निळवंडे- १५ मिमी पाऊस पडला.