उमेदवारांकडून काळ्या पैशाचे वाटप
By Admin | Updated: October 11, 2014 00:11 IST2014-10-11T00:09:05+5:302014-10-11T00:11:01+5:30
पारनेर : कोणत्याही पद्धतीने निवडून येण्यासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांकडून काळ्या पैशाचे वाटप करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे़

उमेदवारांकडून काळ्या पैशाचे वाटप
पारनेर : कोणत्याही पद्धतीने निवडून येण्यासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांकडून काळ्या पैशाचे वाटप करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे़ काही कोटी रुपये निवडणूक आयोगाने पकडले आहेत़ मतदारांनी हे पैसे घेऊ नये, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे़
हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विधानसभा हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे़ त्यासाठी उमेदवार निवडताना मतदार लाचार होत आहे़ दारुची बाटली, ढाब्यावर जेवण, पाचशे-हजार रुपयांसाठी मतदार लाचार होऊन मत देतात़ त्यामुळे लोकशाहीचे पावित्र्य भंग होत असून, लोकशाहीला उज्ज्वल भविष्य कसे मिळणार, असा प्रश्न हजारे यांनी उपस्थित केला आहे़
सत्तेमधून पैसा आणि पैशामधून पुन्हा सत्ता असे दृष्टचक्र लोकशाहीत फिरत असून, कोणत्याही मार्गाने निवडून आलेच पाहिजे, यासाठी उमेदवार आणि राजकीय पक्ष सर्रास लोकांना काळा पैसा वाटत असल्याचे दिसत आहे़ काही कोटी रुपये जप्त करण्यात आल्याच्या बातम्या वाचायला मिळत असून, मतदारांनी हे पैसे घेऊ नये, असे आवाहन हजारे यांनी केले आहे़ योग्य उमेदवार नसल्यास नोटाचे बटन दाबण्याचा पर्याय आहे़
लोकशाहीच्या समृद्धीसाठी मतदारांनी शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये़ स्वतंत्र लढ्यात शहीद झालेल्या भगतसिंग, राजगुरु, सुखदेव अशा लाखो शहिदांच्या बलिदानाची शपथ घेऊन चारित्र्यशील उमेदवारालाच निवडून देण्याची प्रतिज्ञा मतदारांनी करावी, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे़
(तालुका प्रतिनिधी)