आरक्षण मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:30+5:302021-07-19T04:15:30+5:30
पाथर्डी : मराठा व ओबीसी हे दोन्ही आरक्षण हा केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा ...

आरक्षण मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा डाव
पाथर्डी : मराठा व ओबीसी हे दोन्ही आरक्षण हा केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा डाव आहे. राज्यात भाजप ज्या ओबीसी नेत्यांनी रुजविला, वाढविला त्यांची आज काय अवस्था आहे. प्रताप ढाकणे यांच्यावरही भाजपमध्ये अन्याय झाला. संघर्ष करणारे कुटुंब म्हणून ढाकणे कुटुंबाकडे पाहिले जाते. ढाकणे कुटुंबाचा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस वाया जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
शहरातील संस्कार भवन येथे कोरोना योद्धा पुरस्कार वितरण व ॲड. प्रताप ढाकणे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. व्यासपीठावर प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले, ऋषिकेश ढाकणे, गहिनीनाथ शिरसाट, किरण शेटे, बंडूपाटील बोरुडे, बालासाहेब ताठे, सिद्धेश ढाकणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, ५३ वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी या भागात विकासाची मुहूर्तमेढ रोवली. वीज यावी यासाठी मोठे आंदोलन केले तेव्हा कोठे पाथर्डीत वीज आली. प्रताप ढाकणे यांच्या तीन पिढ्यांचा संघर्ष आपण पाहात आहाेत. राष्ट्रवादीत जो संघर्ष करतो त्याला न्याय मिळतो. याउलट स्थिती भाजपमध्ये आहे. तेथे कोणी मोठे झालेले आवडत नाही. प्रताप ढाकणे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्याशी बोलून मी प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रताप ढाकणे म्हणाले, सध्या पाथर्डी तालुक्याला कोणी वाली राहिला नाही. कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आपल्याला खंबीर व्हावे लागेल. सत्तेसाठी लाचार होणारा मी नाही. तुम्ही पाण्यासाठी व विकासासाठी आम्हाला मदत करा.
प्रास्ताविक युवा नेते ऋषिकेश ढाकणे यांनी केले. विना दिघे व उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले.
-----
भाजप सोडले ते चांगलेच झाले...
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपमध्ये गेलो होतो. मात्र माझे तिथे काही जुळले नाही. त्यामुळे पुन्हा मी राष्ट्रवादीत आलो. भाजप सोडले ते चांगले झाले. आज भाजपमध्ये आमच्या भगिनी (पंकजा मुंडे) व नाथाभाऊ खडसे यांचे काय झाले हे महाराष्ट्र पाहात आहे. मतदारसंघातील लाखो लोकांनी मला मते दिली. जनतेचे माझ्यावर प्रेम आहे. तीच माझी ताकद आहे, असे प्रताप ढाकणे म्हणाले.
-----
१८पाथर्डी
पाथर्डी येथे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते ॲड. प्रताप ढाकणे यांचे अभीष्टचिंतन करताना.