भाजप उमेदवाराचे पैसे घेण्यास नकार : मतदाराने दिली पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 14:34 IST2018-12-07T14:34:05+5:302018-12-07T14:34:09+5:30
प्रभाग क्रमांक- १३ मधून भाजपकडून महापालिका निवडणूक लढवत असलेल्या गायत्री कुलकर्णी यांना मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे देण्याचा प्रयत्न झाला

भाजप उमेदवाराचे पैसे घेण्यास नकार : मतदाराने दिली पोलिसात तक्रार
अहमदनगर : प्रभाग क्रमांक- १३ मधून भाजपकडून महापालिका निवडणूक लढवत असलेल्या गायत्री कुलकर्णी यांना मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे देण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी मतदारानेच पोलिसात तक्रार दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री शहरात येत असताना भाजपविरोधात अशी तक्रार दाखल झाली आहे.
शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजता शहरातील चितळेरोडवरील भराड गल्ली परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी श्रीपाद अशोक सावंत यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पैसे वाटणाऱ्या अमृत खताडे याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. श्रीपाद सावंत व त्यांचा मित्र ऋषिकेश वाडेकर हे चौपाटी कारंजा येथे उभा असताना त्याठिकाणी अमृत खाताडे आला. नरेंद्र कुलकर्णी यांच्या पत्नी गायत्री या भाजपकडून उमेदवारी करत आहेत. त्यांना मतदान द्या, असे म्हणून त्याने सावंत व वाडेकर यांना दोन हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला. सावंत यांनी मात्र पैसे घेण्यास नकार दिला व भरारी पथकाला माहिती दिली.