भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना पॅकेज हवे; नगरमध्ये कारखानदारांची गुप्त बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 16:22 IST2020-06-14T16:21:57+5:302020-06-14T16:22:37+5:30
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचा आर्थिक प्रश्न मिटविण्यासाठी आता भाजपमधील सर्वच कारखानदार एकत्र आले आहेत.

भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना पॅकेज हवे; नगरमध्ये कारखानदारांची गुप्त बैठक
अहमदनगर : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचा आर्थिक प्रश्न मिटविण्यासाठी आता भाजपमधील सर्वच कारखानदार एकत्र आले आहेत.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली नगरमधील विळद घाटातील विखे फाउंडेशनच्या परिसरात शनिवारी बैठक झाली. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे साखर कारखानदार उपस्थित होते.
अतिशय गोपनीय झालेल्या या बैठकीत फक्त कारखान्यांच्या आर्थिक स्थितीचाच विषय होता. या बैठकीला माजीमंत्री राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील, राहुल कूल, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील १५ साखर कारखान्यांचे प्रमुख उपस्थित होते.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. अनेक कारखान्यांवर बँकांचे कर्ज आहे. लॉकडाऊननंतरही परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, याची शक्यता नाही. या कारखान्यांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारकडून अपेक्षा व्यर्थ आहे. त्यामुळे कारखान्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज मिळण्याची गरज आहे, याची बैठकीत चर्चा झाली. याबाबतचे एक अंदाजपत्रक निश्चित करण्यासाठी दानवे यांनी विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली.
प्रस्ताव तयार केल्यानंतर तो अर्थमंत्रालयाला सादर केला जाणार आहे. विशेषत: जे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत, अशा आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांचे साखर कारखान्यांचाच विषय बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे जे सध्या भाजपात आहेत, असेच कारखानदार बैठकीला उपस्थित होते.
साखर कारखान्यांसह रोजगार, राज्यातील शेतकºयांची कर्जमाफी या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. हे प्रश्न पक्षश्रेष्ठींकडे मांडणार असल्याची ग्वाही दानवे यांनी या बैठकीत दिली.