भाजप-राष्ट्रवादीची मुंबईत खलबते, महायुतीचा सस्पेन्स; रविवारी घोषणा होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:08 IST2025-12-27T13:08:03+5:302025-12-27T13:08:03+5:30
स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय

भाजप-राष्ट्रवादीची मुंबईत खलबते, महायुतीचा सस्पेन्स; रविवारी घोषणा होण्याची शक्यता
अहिल्यानगर : महापालिकेसाठी भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांमध्ये शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. दोन्ही पक्षांनी अहिल्यानगर महापालिका एकत्रित लढविण्याची तयारी दर्शविली आहे. तिसरा भिडू असलेल्या शिंदेसेनेशी चर्चा अजून बाकी असून, महायुतीचा सस्पेन्स कायम आहे.
महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढविण्याचे आदेश वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना दिले होते. त्यानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठकाही झाल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ३२, भाजप ३० आणि शिंदेसेनेने २४ जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर एकमत झाले नाही. तसेच काही प्रभागांतील जागांवरही महायुतीचे घोडे अडले आहे.
भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी अहिल्यानगर महापालिकेच्या जागावाटपाबाबत मुंबईत बैठक झाली. भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाची एकत्रित बैठक मुंबईत झाली. अशीच बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही होणे अपेक्षित होते. परंतु, शिंदे यांच्याशी चर्चा झाली नाही. शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून रविवारी घोषणा करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. शिंदेसेनेत उपमुख्यमंत्री शिंदे हेच प्रमुख आहेत. परंतु, त्यांच्याशीच अजून भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली नाही. शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या चर्चेतून काय साध्य होणार, हा प्रश्नच आहे. त्यामुळे महायुतीची चर्चा आणखी लांबण्याची चिन्हे आहेत.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक
दरम्यान भाजप व राष्ट्रवादीच्या जागा वाटपाबाबत शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत भाजप व राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढविण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे समजते. शिंदेसेनेसोबत युती करायची किंवा नाही, याबाबत बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांची आज बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे विश्वासनीय सुत्रांनी सांगितले.
इथे अडले घोडे...
शहरातील प्रभाग क्रमांक प्रभाग ९, १२,१५ आणि काही प्रमाणात १६ मध्ये शिंदेसेनेचे प्राबल्य आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी व भाजपकडूनही इच्छुक आहेत. त्यांना या प्रभागांतून उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी व भाजप आग्रही आहेत. मात्र या प्रभागातील एकही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडायच्या नाहीत, अशी भूमिका शिंदेसेनेची आहे. शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली.