आनंदऋषींच्या जन्मस्थळी भाविकांची मांदियाळी
By Admin | Updated: July 28, 2014 00:51 IST2014-07-27T23:12:23+5:302014-07-28T00:51:05+5:30
पाथर्डी : राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या ११४ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र चिचोंडी येथे रविवारी हजारो भाविकांनी जन्मस्थळाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
आनंदऋषींच्या जन्मस्थळी भाविकांची मांदियाळी
पाथर्डी : राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या ११४ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र चिचोंडी येथे रविवारी हजारो भाविकांनी जन्मस्थळाच्या दर्शनाचा लाभ घेतला. ‘आनंद... आनंद.. जय जय आनंद...’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आनंदऋषीजी हे कोणत्या एका जातीचे अथवा समाजाचे संत नव्हते. त्यांनी आयुष्यभर मानवहितासाठी कार्य केले. त्यांच्या विचाराची आज खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन ह. भ.प. जगन्नाथ महाराज पाटील (भिवंडी) यांनी यावेळी केले.
रविवारी सकाळी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र चिचोंडी येथे राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने जमा झाले. पायी दिंड्या दाखल झाल्या. सकाळी गावातून महाराजांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी झालेला महाप्रदक्षिणा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जन्मस्थळाच्या ठिकाणी प्रसाद म्हणून साखरेचे वाटप करण्यात आले. मिरवणूक श्री आनंद विद्यालयाच्या आवारात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. आनंदऋषीजींनी आयुष्यभर अनाथ, दीन दुबळयांसाठी काम केले. शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या, दवाखाने उभारले. सर्वधर्मसमभाव हा संदेश त्यांनी दिला, असे त्यांनी कीर्तनात सांगितले.
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष चंपालाल गांधी, सुरेश कुचेरिया, अॅड वसंत मुथा यांनी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला. सोहळयास ह.भ. प.अनिल महाराज वाळके, उपसभापती संभाजी पालवे, मोहनराव पालवे, एकनाथ आटकर, बी. के.आव्हाड, पद्माकर आव्हाड यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. जन्मोत्सवानिमित्त श्री आनंद मेडिकल ट्रस्ट येथे शिबिराचे उद्घाटन ह. भ. प.अनिल महाराज यांच्या हस्ते झाले. शिबिरात सुमारे १०० दात्यांनी रक्तदान केले असून १०१ बाटल्या जमा झाल्याची माहिती डॉ. संतोष बोरूडे यांनी दिली. या कार्यक्रमात आनंदऋषीजी म. सा. यांच्या जीवनावरील कॅसेटचे प्रकाशन करण्यात आले. स्वागतगीत शाहीर भारत गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन सुनील कटारिया तर आभार प्रदीप कुलट यांनी मानले. यावेळी महाप्रसादाचे वाटप केले. तरूण मंडळांनी भाविकांसाठी मोफत चहा नाष्ट्याची व्यवस्था केली होती. संपतलालजी हर्षदकुमारजी भटेवरा व चुनीलालजी ललीतकुमारजी भटेवरा यांनी महाप्रसादासाठी योगदान दिले. चंदनमलजी राजेंद्रकुमारजी मुथा यांनी मंडपासाठी योगदान दिले.