भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाभरात अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:15 IST2018-04-14T13:15:12+5:302018-04-14T13:15:59+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाभरात अभिवादन
अहमदनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले आहेत. राज्यभरात सुरु असलेल्या सामाजिक समता सप्ताहाचा आज समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
शहरातील सीएसआरडी महाविद्यालयात आज सामाजिक समता सप्ताहाचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे, प्रा. संजय नगरकर उपस्थित होते. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळीच्या कार्यक्रमात समाजकल्याण विभागाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत व स्वाधार योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या विविध लाभार्थींचा प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी महाजन आणि मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील विशेषांकाचेही वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार नितीन उबाळे यांनी मानले.