आयुर्वेदशास्त्र मंडळाच्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: July 21, 2014 00:28 IST2014-07-20T23:20:27+5:302014-07-21T00:28:01+5:30
अहमदनगर : आयुर्वेदशास्त्र सेवा मंडळ या संस्थेच्या गैरकारभाराची चौकशी करावी, असे आदेश विधानसभा सभापतींनी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला दिली आहेत.

आयुर्वेदशास्त्र मंडळाच्या चौकशीचे आदेश
अहमदनगर : आयुर्वेदशास्त्र सेवा मंडळ या संस्थेच्या गैरकारभाराची चौकशी करावी, असे आदेश विधानसभा सभापतींनी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला दिली आहेत. त्यानुसार या विभागाने डॉ. श्रीधर दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत मंडळाचे सविस्तर म्हणणे ३० दिवसात सादर करण्याचे आदेश आयुर्वेदशास्त्र सेवा मंडळाला दिले आहेत.
अहमदनगरमधील आयुर्वेदशास्त्र सेवा मंडळ या संस्थेमध्ये होत असलेल्या गैरकारभारामुळे ही संस्था बरखास्त करावी, अशी मागणी करण्यासाठी या संस्थेतील डॉ. श्रीधर दरेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी केली होती. डॉ. दरेकर यांनी तीन-चार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यावेळी संस्थेची चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. दरम्यान विधीमंडळाच्या अधिवेशनात या संस्थेच्या गैरकारभाराबाबत आमदार अनिल राठोड यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न विधानसभा अध्यक्षांनी स्वीकृत केला आहे. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तीस दिवसात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने द्यावे, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले होते. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाने पत्र पाठवून खुलासा करण्याचे आदेश संस्थेला दिले आहेत. या पत्रात म्हटले आहे की, आयुर्वेदशास्त्र सेवा मंडळ ही संस्था बरखास्त करून संस्थेवर प्रशासनाची नियुक्ती करावी. तसेच संस्थेतील गैरकारभाराची चौकशी करावी.
या मागणीसाठी संस्थेतील विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीधर दरेकर यांनी पत्नीसह ६ मार्च २०१४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून निवेदन दिले होते. ही बाब खरी असल्यास त्यांच्या निवेदनात कोणकोणत्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. याबाबत चौकशी केली आहे काय? चौकशीत काही आढळून आले तर त्या अनुषंगाने संस्थेवर कारवाई केली काय, चौकशीची कारवाई झाली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत, त्याबाबत सद्यस्थिती काय आहे, याचा खुलासा करावा, असे त्यात म्हटले आहे. (प्रतिनिधी)