मुक्या, भटक्या जीवाची भूक जाणतो अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:10 IST2019-03-05T11:10:37+5:302019-03-05T11:10:41+5:30
रोज मोकाट फिरणाऱ्या कुत्री,मांजरांना सकाळी व सांयकाळी सायकलचा आवाज आला की सायकलभोवती ते शेपटीचा गोंडा घोळत पिंगा घालत पटापट जमा होतात.

मुक्या, भटक्या जीवाची भूक जाणतो अवलिया
विश्वास रेणूकर
राशीन : रोज मोकाट फिरणाऱ्या कुत्री,मांजरांना सकाळी व सांयकाळी सायकलचा आवाज आला की सायकलभोवती ते शेपटीचा गोंडा घोळत पिंगा घालत पटापट जमा होतात. अन् त्यांची भूक ओळखून मुक्या जीवांना अन्नाचा घास भरविण्याचे काम नित्याचे झाले आहे.
राशीन येथील सय्यद अकबर मैनुद्दीन कवीजंग जहागिरदार आठ वर्षांपासून हे काम करीत आहेत. घरात रात्रीच्या जेवणानंतर शिळे राहिलेले अन्न ते सकाळी जमवून घराजवळील चौकात गावात मोकाट फिरणाऱ्या कुत्री, मांजरांना टाकतात. जहागिरदार यांचा हा नित्यक्रम झाल्याने शेजारची मित्रमंडळी त्यांच्या घरातील शिल्लक भाकरी-चपाती आठवणीने जहागिरदार यांना देतात. सकाळी उठल्यानंतर घरातून कामाला जाण्याआगोदर रोज इतरत्र फिरणारी मुकी जनावरे त्यांची वाट पहातच बसलेले असतात. घरातून निघताना सायकलचा आवाज कानावर पडला की मुके प्राणी जमा होतात. आणि टाकलेले तुकडे खाऊन निघून जातात. सायंकाळीही परत सकाळसारखी पुनरावृत्ती होते. जहागिरदार कामावरून येताना दिसले की जमा होतात.
जहागिरदार यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. असे असताना देखील मुले लहान असताना स्वत:च्या संसारासाठी भाकरीतला चंद्र शोधण्यासाठी निघालेल्या परिस्थितीतूनच मुक्या, भटक्या जीवांची ‘भूक’ त्यांना दिसली. मोलमजुरीतून जे काही उरलेलं अन्न मुक्या जीवांच्या पोटाची भूक काही प्रमाणात का होईना भागवेल, या भावनेतून त्यांनी हा छंद जोपासला.
परमेश्वराने पोट दिले. त्याच्या अन्नपाण्याची सोय देखील त्यानेच केली. आपण मात्र निमित्त असल्याचे सांगत माणसाला लागलेली भूक तो बोलून दाखवितो. त्यासाठी तो कष्ट करतो. पण मुक्या भटक्या जीवाने काय करावे.
हीच जाणीव प्रत्येकाने ठेवल्यास सद्भावना वाढीस लागेल. मुकी जनावरे टाकलेले तुकडे खाऊन परत जाताना मला मोठे समाधान मिळत असल्याचे जहागिरदार सांगतात. त्यांना मुक्या जीवांबरोबरच दिव्यांग व्यक्तीची फार किव वाटते. दोन वर्षांपूर्वी ते राशीनमधील दिव्यांग श्रीदास साळवे यांना अपंग भत्ता मिळवून देण्यासाठी सरकारी कामकाजानिमित्त राशीन-कर्जत अशी सायकल ढकलण्याठी ते तब्बल पाच वेळा गेले.
परिस्थिती माणसाला जगायचे व मरायचे शिकवते. निर्णय आपण घ्यायचा असतो. कर्म प्रत्येकाचे वेगवेगळ असते. नियती फार मोठी असते. दातृत्वाची भावना निष्काम ठेवा. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळले नाही पाहिजे.
-सय्यद अकबर मैनुद्दीन जहागिरदार.
आम्ही वडिलांना खर्चासाठी महिन्याकाठी पाच-सहाशे रूपये देतो. एखादेवेळेस शिळे अन्न नसल्यास बिस्किट पुडे घेऊन ते प्राण्यांना खाऊ घालतात, पण खंड करीत नाहीत.
-साहिल जहागिरदार (सय्यद अकबर यांचा मुलगा).