अशोक साखर कारखान्याच्या २००९-१० च्या गाळपातील ऊस प्रोत्साहन अनुदानापोटी ४ कोटी ३४ लाख रुपये ऊस उत्पादक लाभार्थ्यांना देणे होते. मात्र ते दिले गेले नाही. शेतकरी संघटनेच्यावतीने २०१७ पासून पाच वर्षे वेळोवेळी साखर सहसंचालकांकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेत आतापर्यंत तीनवेळा प्रथम विशेष लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी वेळोवेळी चौकशी करून अहवालही सादर केले. नुकत्याच १ जानेवारी २०२१ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, ४ कोटी ३४ लाख रुपयांच्या अनुदानापैकी २ कोटी ९ लाख रुपये खर्च झाल्याचे दिसून येते. मात्र ही रक्कम एकाही लाभार्थ्याला मिळालेली नाही. अहवाल सादर झाल्यानंतर संबंधित अनुदान सभासदांना देण्याचे आदेश देणे अपेक्षित होते. मात्र अद्याप सहा महिने उलटूनही प्रादेशिक सहसंचालकांकडून कुठलाही आदेश निघालेला नाही. शिवाय अनुदानाचा कालावधी ११ वर्षांचा आहे. त्यानुसार अनुदानाच्या व्याजाची रक्कम ८ कोटी ४७ लाख रुपये झाली आहे. व्याजासह ही थकीत रक्कम सुमारे १३ कोटी झाली आहे. त्यामुळे १४ ऑगस्टला नगर येथील कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
साखर सहसंचालक कार्यालयास ठोकणार टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST