राष्ट्रवादीकडून अखेर अविनाश घुले यांचीच वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:23 IST2021-02-11T04:23:07+5:302021-02-11T04:23:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : महापालिका स्थायी समितीच्या सदस्य पदासाठी राष्ट्रवादीकडून कुमार वाकळे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीने ...

Avinash Ghule's character from NCP | राष्ट्रवादीकडून अखेर अविनाश घुले यांचीच वर्णी

राष्ट्रवादीकडून अखेर अविनाश घुले यांचीच वर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : महापालिका स्थायी समितीच्या सदस्य पदासाठी राष्ट्रवादीकडून कुमार वाकळे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीने अविनाश घुले यांच्यासह समद खान यांची वर्णी लावली असून, घुले हेच सभापती पदाचे दावेदार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले. भाजपकडून वंदना विलास साठे व रवींद्र बारस्कर यांची वर्णी लावण्यात आली आहे. शिवसेनेकडून रिता भाकरे, सचिन शिंदे, परसराम उर्फ प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बसपकडून गटनेते मुदस्सर शेख यांनी स्वतःचेच नाव सदस्य पदासाठी सुचविले.

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी महापालिकेत स्थायी समिती सदस्य नियुक्तीसाठी सभा झाली. महापौर वाकळे यांनी गटनेत्यांनी दिलेले बंद पाकीट उघडून सदस्यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी बंद पाकिटातून त्यांच्या पक्षाचे घुले व समद खान यांची नावे दिली. शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांच्याकडून शिंदे, भाकरे आणि गायकवाड यांची नावे सुचविण्यात आली. भाजपच्या गटनेत्या तथा उपमहापौर मालन ढोणे यांनी त्यांच्या पक्षाच्या दोन सदस्यांची नावे सुचविली. बसपाकडून गटनेते मुदस्सर शेख यांनी स्वतःचे नाव सुचविल्याने अश्विनी जाधव यांचा पत्ता कट झाला आहे. राष्ट्रवादीकडून कुमार वाकळे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, राष्ट्रवादीने ज्येष्ठ नगरसेवक अविनाश घुले यांची वर्णी लावली आहे.

स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी नवीन आठ सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे दोन, तर सेनेच्या तीन नगरसेवकांची स्थायी समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यांची संख्या आता १६ झाली आहे. मनोज कोतकर हे स्थायी समितीचे सभापती आहेत. नवीन सदस्य नियुक्तीमुळे सभापती पदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अविनाश घुले, काँग्रेसकडून सुप्रिया जाधव, भाजपकडून रवींद्र बारस्कर हे इच्छुक आहेत.

....

मुद्दसर शेख यांच्याकडे होती दोन पाकिटे

नगरसेवक मुद्दसर शेख हे बसपाचे गटनेते आहेत. शेख यांनी सभापती पद भूषविले. मागीलवेळी त्यांच्या नावाची चिठी न निघाल्याने ते दोन वर्षे सदस्य म्हणून राहिले. ते निवृत्त झाले होते. त्यामुळे शेख हे कुणाचे नाव सुचवितात, याची उत्सुकता होती. शेख हे सभागृहात आले, त्यावेळी त्यांच्याकडे दोन पाकिटे होती. दुसऱ्या पाकिटात अश्विनी जाधव यांचे नाव असल्याची चर्चा होती. परंतु, शेख यांनी स्वत:चे नाव असलेलेच पाकीट महापौरांना सादर केले.

....

वाकळे यांना डावलल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे हे निवृत्त झाले आहेत. ते पुन्हा सदस्य म्हणून येण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी त्यासाठी प्रयत्नही केले. सदस्य नियुक्ती सभा घ्यावी, यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु, राष्ट्रवादीने अविनाश घुले यांची वर्णी लावली. आमदार संग्राम जगताप व कुकार वाकळे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. असे असताना वाकळे यांना का डावलले, याचीच चर्चा महापालिका वतुर्ळात होती.

....

सेना, भाजप, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रवादीकडून सभापती पदासाठी घुले हे इच्छुक आहेत. सभापती पदासाठीच घुले यांची सदस्य म्हणून वर्णी लावण्यात आली आहे. स्थायी समितीत राष्ट्रवादी व सेनेचे समान संख्याबळ आहे. याशिवाय भाजपचे चार, तर काँग्रेस व बसपाचा प्रत्येकी एक, असे संख्याबळ आहे. भाजप, काँग्रेस आणि सेना काय भूमिका घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.

Web Title: Avinash Ghule's character from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.