अधिकाऱ्यापाठोपाठ नेवाशात पाेलीस कर्मचाऱ्याचाही ऑडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:26 IST2021-08-14T04:26:15+5:302021-08-14T04:26:15+5:30
नेवासा : सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या ऑडिओ बॉम्बमुळे जिल्ह्यातील पोलीस दलासह नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. गुरुवारी एका अधिकाऱ्याच्या ...

अधिकाऱ्यापाठोपाठ नेवाशात पाेलीस कर्मचाऱ्याचाही ऑडिओ व्हायरल
नेवासा : सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या ऑडिओ बॉम्बमुळे जिल्ह्यातील पोलीस दलासह नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. गुरुवारी एका अधिकाऱ्याच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी एका पोलीस कर्मचाऱ्याचीही एक वाहन सोडण्यासाठीच्या हप्त्याबाबतच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली.
गुरुवारी नेवासा पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याची अवैध धंदा असणाऱ्या व्यक्तीबरोबर असलेल्या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर या प्रकारच्या चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षात तत्काळ बदली करण्यात आली. त्या प्रकरणाची चर्चा तालुकाभर सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी एका पोलीस कर्मचाऱ्याची वाहन सोडण्याबाबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे तालुक्यातील पाेलीस अधिकारी, कर्मचारी व अवैध व्यावसायिक यांच्यातील साटेलोटेची चर्चा रंगू लागली आहे.
हा नक्की काय प्रकार आहे? कशाची आहेत ही वाहने आणि आता हा पोलीस कर्मचारी कोण? अशी चर्चा आता तालुक्यात रंगली आहे.
---
व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठांना याबाबतचा अहवाल पाठविला जाईल.
- विजय ठाकूर,
प्रभारी अधिकारी, नेवासा पोलीस ठाणे
-------
नेवासा पोलीस ठाण्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दररोज एक-एक प्रताप समोर येत आहे. तालुक्यात वाळू तस्करीसह अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. वादग्रस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची गरज आहे.
-संजय सुखधान,
सामाजिक कार्यकर्ते
-----
पोलीस कर्मचारी व एका व्यक्तीच्या व्हायरल क्लिपमधील संभाषण
पोलीस कर्मचारी : चालू महिन्याचे पैसे नाही वीस दिवस झालेत. सात-आठ हजार घेऊन करता काय.
समोरील व्यक्ती : या वाहनापुरते घ्या उद्यापासून त्याचे वाहन बंद करतो.
पोलीस कर्मचारी : हे मागचंच चाललंय पंधरा-वीस दिवस झालेत. त्याचं कोण देईल. आता मागच्या महिन्याचे पण त्याने नाही दिले. आपल्याला निम्मेच पोहोच केले.
समोरील व्यक्ती : तुमचं काय हप्त्याचं असेल तुम्ही बघून घ्या. पण आता वाहन धरले ना तुम्ही. आठ हजार घेऊन टाका सहा, त्याच्याकडून आता घ्या. दोन हजार मी देतो.
पोलीस कर्मचारी : नाही नाही आठ-दहा हजारांत सोडणार नाही. उपयोग नाही त्या गोष्टीचा. त्यापेक्षा लावून देतो त्याला म्हणा जामीन करून घे एखाद्या वकिलाकडून पाचशे, हजार रुपयांत आणि व्हय मोकळा.
समोरील व्यक्ती : बरं आठ घेऊन जर सोडली तर काय होईल बर मला सांगा.