अहमदनगर : मिरजगाव येथे मूळ खरेदीदाराला दादागिरी करून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत असून याबाबत पोलीसही दुर्लक्ष करत आहेत. न्याय मिळत नसल्याने खरेदीदाराने लोकशाही दिनात आपली कैफियत मांडून न्यायाची अपेक्षा केली आहे.
याबाबत अरुण सावळेराम नरसाळे यांनी लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मिरजगाव (ता. कर्जत) येथे २००५ मध्ये नरसाळे यांनी त्रिंबक दत्तात्रय गुंजाळ यांच्या मालकीची मिरजगाव गावठाणातील खुली जागा घरबांधणीसाठी खरेदी केली होती. त्याची सिटी सर्व्हेत नोंद होताच त्रिंबक गुंजाळ यांनी नरसाळे यांना जागेचा ताबा दिला. नरसाळे यांना काही कारणास्तव लगेच तेथे घर बांधता आले नाही. आता निवृत्ती जवळ आल्याने त्यांनी ती जागा विक्रीस काढली आहे. परंतु तेथे प्रल्हाद दत्तात्रय गुंजाळ व त्यांचा मुलगा शिवदास प्रल्हाद गुंजाळ या त्रयस्तांकडून नरसाळे यांना त्रास दिला जात आहे. हे दोघे जण आपल्याला जीवे मारण्याची धमकी देऊन येथे राहायचे नाही, असे सांगत असल्याचे नरसाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मूळ मालक त्रिंबक गुंजाळ यांनी हा सर्व्हे नंबर खरेदी केलेला आहे. ती त्यांची वडिलोपार्जित जागा नाही. या प्रकरणात त्रिंबक गुंजाळ हे कोणतीही अडवणूक करत नाहीत. परंतु त्यांचे भाऊ आहे असे सांगून इतर दोघे दादागिरी करून जागा बळकावण्याच्या उद्देशाने त्रास देत आहेत. याबाबत आपण २० नोव्हेंबर २०१९ रोजी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र अद्याप त्रास देणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही, असे नरसाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
----------
त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तीला बोलावून लेखी समज दिली आहे. त्यांनी नरसाळे यांना जागेत जाण्यापासून रोखले तर गुन्हा दाखल करू.
- अमरजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक, मिरजगाव दूरक्षेत्र