सेना - राष्ट्रवादी साखरपुड्याने नगरसेवकांचा अपेक्षाभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:45+5:302021-06-24T04:15:45+5:30
अहमदनगर : यंदाच्या महापौर निवडणुकीत नगरसेवकांना मोठी अपेक्षा होती. सहलीला कुठे जायचे, कोणाची तयारी किती कोटीपर्यंत आहे, ही चर्चा ...

सेना - राष्ट्रवादी साखरपुड्याने नगरसेवकांचा अपेक्षाभंग
अहमदनगर : यंदाच्या महापौर निवडणुकीत नगरसेवकांना मोठी अपेक्षा होती. सहलीला कुठे जायचे, कोणाची तयारी किती कोटीपर्यंत आहे, ही चर्चा रंगात आली होती. परंतु, सेना - राष्ट्रवादीने मुुंबईत एकत्र येत सारखपुडा उरकून घेतला. सेना - राष्ट्रवादीच्या या नव्या मैत्रीने सर्वच पक्षांतील नगरसेवकांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे तेलही गेले आणि तूपही..., असे म्हणण्याची वेळ नगरसेवकांवर आली आहे.
महापौर निवडणुकीत मतदार असलेल्या नगरसेवकांची चांगली ठेप ठेवावी लागते. नगरसेवकांच्या इच्छा पूर्ण करताना उमेदवारांची अक्षरश: दमछाक होते. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मतदानाच्या काही दिवस आधीच नगरसेवकांना सुरक्षितस्थळी म्हणजे सहलीवर नेण्याची तयारी सुरू होते. यंदाही तशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. त्यात लॉकडाऊन असल्याने वर्षभर बाहेर जाता आले नाही. महापौर निवडणुकीच्यावेळी एकदाच सर्व मौजमजा करता येईल, अशी आशा नगरसेवक बाळगून होते. महापौर निवडणूक तोंडावर आली असतानाच लॉकडाऊनही शिथिल झाले. त्यामुळे आता सहल पक्की, असे प्रत्येक नगरसेवकाला मनोमन वाटत होते. त्यामुळे काहींनी सहलीची तयारीही करून ठेवली होती. बँग भरून अनेकजण निरोपाची वाट पाहत होते. सेना व राष्ट्रवादी एकमेकांपासून दूर होते. त्यांच्यातील दुरावा संपूच नये, त्यांच्यात फाटाफूट झाली तर संधीचे दरवाजे खुले होतील, यावर चर्चा झडत होती. काहींना पदे, तर काहींना सहल आणि त्यासोबत अन्य लाभाचीही अपेक्षा होती. मात्र अनपेक्षितपणे सेना व राष्ट्रवादीने जुळवून घेतले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होऊन आघाडीवर शिक्कामोर्तब झाला. आमदार संग्राम जगताप, अजित पवार, भाऊ कोरगावकर, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे यांचा समावेश असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोने महापौर निवडणुकीचे चित्र स्पष्ट केले. सेनेकडे २३, तर राष्ट्रवादीचे १९ इतके संख्याबळ आहे. म्हणजे दोघांचे मिळून ४२ झाले. बहुमतासाठी ३४ नगरसेवक लागतात. बहुमतापेक्षाही जास्त संख्या होत असल्याने भाजप, काँग्रेस, बसपा, अपक्ष यापैकी कुणाचीही गरज उरली नाही, हे व्हायरल फोटोमागील सत्य आहे. सेना व राष्ट्रवादीच एकत्र आल्याने सहलीची चर्चा थांबली असून, निवडणुकीत होणाऱ्या उलाढालीला चाप बसण्याची शक्यता आहे.
......
भाजपाला उपमहापौर पदासाठी अपेक्षा
मागील अडीच वर्षे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेत राहिलेल्या भाजपला यावेळी उपमहापौरपद मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष हे स्वत: इच्छुक होते. याबाबत खासदार डॉ. सुजय विखे आणि त्यानंतर माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे बैठकही झाली होती. परंतु, सेना-राष्ट्रवादीचेच जुळल्याने भाजपचे महत्त्व आपोआप कमी झाले.
.....
बसपाची संधी हुकली
मागीलवेळी राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्यात बसपाला स्थायी समिती सभापती पदाची लॉटरी लागली. यावेळी सेना व राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यास आपल्याला उपमहापौरपद मिळेल, असे बसपाला वाटत होते. त्यासाठी माजी सभापती सचिन जाधव हे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नात होते.