सभापतीसाठी सेना, भाजपात दंड बैठका सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:25 IST2021-03-01T04:25:25+5:302021-03-01T04:25:25+5:30

अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी येत्या गुरुवारी निवडणूक होत असून, सभापती पदासाठी शिवसेना व भाजपानेही जोर लावला ...

Army, BJP start penalty meetings for Speaker | सभापतीसाठी सेना, भाजपात दंड बैठका सुरू

सभापतीसाठी सेना, भाजपात दंड बैठका सुरू

अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी येत्या गुरुवारी निवडणूक होत असून, सभापती पदासाठी शिवसेना व भाजपानेही जोर लावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे; परंतु नगर शहरात मात्र सेना व राष्ट्रवादीचा सूर जुळलेला नाही. चार महिन्यांपूर्वी झालेल्या सभापती निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांवर समोर उभे ठाकले होते; परंतु ऐनवेळी सेनेने माघार घेत भाजपामधून राष्ट्रवादीत आलेले मनोज कोतकर यांचा सभापती पदाचा मार्ग मोकळा केला. हे सर्व करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना नगरमध्ये यावे लागले होते. गेल्या चार महिन्यांत हे दोन्ही पक्ष एकत्र आले नसून, त्यांच्यात हा दुरावा कायम आहे. त्यामुळे सेनेने नेहमीप्रमाणे सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. सेनेकडून सचिन शिंदे व विजय पठारे यांची नावे चर्चेत आहेत. या दोघांपैकी काेण याबाबत सेनेत चर्चा सुरू आहे. तसेच भाजपाने महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीची मदत घेतली. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवार न देता राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या विचारात शहर भाजपा होते; परंतु वरिष्ठांनी उमेदवार देण्याच्या सूचना केल्याने त्यांच्याकडून रवींद्र बारस्कर यांचा अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे. हे तिन्ही पक्ष सभापती पदाच्या निवडणुकीत उतरल्यास सदस्यांचे महत्त्व वाढणार आहे.

सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे करण्याची दोन्ही पक्षांची खेळी दिसते. शिवसेनेकडून शिंदे व पठारे यांच्यापैकी एकाचा अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे. मागील सभापती निवडीच्यावेळीही नगरसेवक योगिराज गाडे यांनी अर्ज दाखल केला होता; परंतु ऐनवेळी तो मागे घेण्यात आला होता. त्याचीच पुनरावृत्ती यावेळी होणार की सेना व राष्ट्रवादीत लढत होणार, याची उत्सुकता आहे.

....

भाजपाचा पाठिंबा मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

शिवसेनेकडून ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास सेना व राष्ट्रवादीत सभापती पदासाठी लढत होईल. स्थायी समितीत राष्ट्रवादी व सेनेचे प्रत्येकी पाच सदस्य आहेत. भाजपाचे चार सदस्य आहेत. याशिवाय काँग्रेस व बसपा यांचे प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाची मदत घ्यावी लागेल. भाजपाकडून उमेदवार दिल्यास मोठी अडचण निर्माण होणार असून, भाजपाचा पाठिंबा मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

Web Title: Army, BJP start penalty meetings for Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.