१० दिवस कामालाच गेला नाही अन् शेवटी...शनैश्वर देवस्थानच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आई-वडिलांना होता एकुलता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:32 IST2025-07-31T15:27:35+5:302025-07-31T15:32:04+5:30

शनैश्वर देवस्थानच्या आणखी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Another employee of Shanaishwar Devasthan end his life in ahilyanagar | १० दिवस कामालाच गेला नाही अन् शेवटी...शनैश्वर देवस्थानच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आई-वडिलांना होता एकुलता

१० दिवस कामालाच गेला नाही अन् शेवटी...शनैश्वर देवस्थानच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आई-वडिलांना होता एकुलता

Shanaishwar Devasthan Trust: शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टमधील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार आणि भाविकांच्या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. या घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर आता शनैश्वर देवस्थानचा कंत्राटी कर्मचारी शुभम विजय शिंदे याने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी सोमवारी आत्महत्या केली. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे. 

शुभम शिंदे याचे आईवडील हे शेतात कामाला गेले होते. घराच्या वरच्या पत्र्याच्या खोलीत त्याने गळफास घेतला. शेजारील मुलांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी ही माहिती परिसरातील नागरिकांना सांगितली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. शुभमने बुधवारी दुपारी ४ वाजून १५ मिनिटांपूर्वी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात दत्तात्रय आप्पासाहेब शिंदे (रा. बेल्हेकरवाडी) यांनी सोनई पोलिस ठाण्यात खबर दिली. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिंदे याच्या मृतदेहाचे नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा बेल्हेकरवाडी येथे त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिंगणापूर देवस्थानवर विविध घोटाळ्यांचे आरोप झाल्याने हे देवस्थान चर्चेत आहे. ही चौकशी सुरु असतानाच गत सोमवारी सकाळी देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी शेटे यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. त्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शिंदे हा कर्मचारीही देवस्थानमध्ये कामाला होता. शिंदे हा देवस्थानमध्ये वॉचमन होता. तो अधिकार पदावर नव्हता. त्यामुळे इतर कारणांमुळे त्याने आत्महत्या केलेली असावी अशी चर्चा आहे.

शुभम हा त्याच्या आई-वडिलांना एकुलता होता. तसेच तो अविवाहित होता. शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये तो खाजगी कंत्राटी कर्मचारी (वॉचमन) म्हणून कामाला होता. गोशाळा, मंदिर परिसर, भक्तनिवास आदी विभागात आलटून-पालटून त्याने कामे केली. सध्या दहा दिवसांपासून तो कामावर जात नव्हता. आत्महत्येबाबत अद्याप ठोस कारण मिळाले नसल्याचे पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब लबडे यांनी सांगितले.
 
दरम्यान, शनैश्वर देवस्थानमधील बनावट अॅपप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनैश्वर देवस्थानच्या नावाखाली वेगवेगळ्या बनावट अॅपच्या माध्यमातून भक्तांकडून शुल्क वसूल करण्यात आले होते. ही रक्कम काही कोटींच्या घरात आहे. यातील बहुतांश व्यवहार ऑनलाइन झालेले. त्यामुळे सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.अॅपच्या माध्यमातून पूजा, तेल चढविणे, अभिषेक, अशा सेवा देण्यात येत होत्या. त्यासाठी भक्तांकडून ५०० ते २००० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. यातील रक्कम देवस्थानच्या बँक खात्यात जमा झाली आहे का?, याची चौकशी करण्यात आली. मात्र तसे काहीच झालं नव्हतं. वेगवेगळ्या अॅपमधून देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात एक कोटीहून अधिक रक्कम जमा झालेलं आढळून आलं आणि हे प्रकरण उघडकीस आले.
 

Web Title: Another employee of Shanaishwar Devasthan end his life in ahilyanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.