VIDEO :...अन् डॉ. सुजय विखे सह्याच करायला विसरले, कार्यकर्त्यांची एकच धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:31 IST2019-04-01T14:49:49+5:302019-04-01T16:31:57+5:30
सोमवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपचे उमेदवार सुजय विखे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आले.

VIDEO :...अन् डॉ. सुजय विखे सह्याच करायला विसरले, कार्यकर्त्यांची एकच धावपळ
अहमदनगर : सोमवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपचे उमेदवार सुजय विखे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आले. तीन मंत्री, तीन आमदार, भाजप-सेनेचे पदाधिकारी सर्व जवाजम्यासह अर्ज भरण्यास सज्ज असतानाच विखे अर्जावर सह्या करायलाच विसरले. ऐनवेळी त्यांनी बाजूला येत एका झाडाखाली तीन अर्जांवर घाईघाईत सह्या केल्या. एवढी यंत्रणा असतानाही सह्या कशा विसरल्या ही एकच चर्चा यावेळी रंगली. या प्रकारामुळे विखे यांचे वकील, तसेच इतर कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली. सह्या उरकल्यानंतर विखे अर्ज भरण्यासाठी रवाना झाले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉ.सुजय विखे यांनी नुकताच अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, डॉ.सुजय विखे यांनी अर्ज दाखल केला. डॉ.सुजय विखे यांचे चार अर्ज दाखल केले.
सकाळी दहा वाजता दिल्लीगेटपासून मोठ्या संख्येने रॅली काढण्यात आली. दिल्लीगेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत ही रॅली नेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपाने शक्तीप्रदर्शन केले. यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाध्य शशिकांत गाडे, धनश्री विखे उपस्थित होते.