समनापूर गावात घडलेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत - राधाकृष्ण विखे पाटील
By शेखर पानसरे | Updated: June 7, 2023 14:56 IST2023-06-07T14:56:05+5:302023-06-07T14:56:19+5:30
निरपराध लोकांवर कारवाई होणार नाही ; संगमनेरात पत्रकारांशी संवाद

समनापूर गावात घडलेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत - राधाकृष्ण विखे पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : समनापूर गावात घडलेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये निरपराध लोकांवर कारवाई होणार नाही. याचीही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये जे दोषी आहेत, ते कोणत्या धर्माचे यापेक्षा कायदा हातात घेणाऱ्यांच्या संदर्भात जिल्हा पोलिस प्रमुखांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
संगमनेर शहरात मंगळवारी (दि.०६) सकल हिंदू समाजाचा भगवा मोर्चा पार पडला. त्यानंतर कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील समनापूर गावात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी झालेल्या दगडफेकीत तिघे जखमी झाले. तसेच काही वाहनांचे नुकसान झाले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला तत्काळ घटनास्थळी पोलिस फौजफाट्यासह पोहोचले. परिस्थितीवर त्यांनी नियंत्रण मिळविल्याने पुढील अनुचित प्रकार टळला होता.
बुधवारी (दि.०७) महसूलमंत्री विखे पाटील संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. समनापूर येथील घटनेसंदर्भात पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. विखे पाटील म्हणाले, सकल हिंदू समाजाच्या वतीने संगमनेरात मोर्चा झाला. लोकांच्या भावना तीव्र आहेत. चाळीस-पन्नास हजार नागरिक मोर्चाला येतात. त्यांच्या साधनांनी येतात, हे कशाचे प्रतीक आहे. त्यामुळे स्वाभाविकच लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा तीव्र आहेत. याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा. असे नाही.