हायस्पीड रेल्वे मार्गातून अकोले तालुका वगळू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:39+5:302021-06-23T04:14:39+5:30
लहामटे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी मुंबई भेट घेऊन रेल्वे मार्ग पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार बोटा - घारगाव - ...

हायस्पीड रेल्वे मार्गातून अकोले तालुका वगळू नये
लहामटे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी मुंबई भेट घेऊन रेल्वे मार्ग पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार बोटा - घारगाव - देवठाण - सिन्नर असाच व्हावा, याबाबत आग्रह धरणार आहे. वेळ पडल्यास कृती समितीच्या बरोबरीने आंदोलनात सहभागी होऊ. कुठल्याही परिस्थितीत तालुक्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. तसेच शिर्डी - शहापूर रेल्वे मार्ग व्हावा, ही तालुक्याची जुनीच मागणी पुन्हा सरकार दरबारी मांडणार आहे. रेल्वे मार्ग संघर्ष कृती समितीच्या मागणीला पाठिंबा दिला.
नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाचा पूर्वी जो सर्वे झाला, त्यात तालुक्यातील देवठाण येथे उप रेल्वेस्टेशन प्रस्तावित होते. नव्या सर्वेत संगमनेर शहराच्या पूर्वेकडून रेल्वे मार्ग दाखवला आहे. भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे.
नवा रेल्वे मार्ग ४० किलोमीटरने वाढल्याने तीन हजार कोटी आर्थिक भार सरकारवर पडणार आहे. तसेच पुणे नाशिक प्रवासाचा वेळ दीड तासांनी वाढणार आहे. तालुक्यातील पर्यटन विकास व्यवसाय वृध्दिंगत होण्यासाठी व शेती पूरक व्यवसायास चालना मिळेल, यासाठी अकोले तालुक्यास रेल्वे मार्गातून वगळू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा रेल्वेमार्ग संघर्ष कृती समितीने दिला.
तहसीलदार मुकेश कांबळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी निवेदन स्वीकारले. रेल्वेमार्ग संघर्ष कृती समितीचे महेश नवले, विजय वाकचौरे, संतोष फापाळे यांनी आंदोलनाची भूमिका विशद केली. प्रदीप हासे, नितीन नाईकवाडी, रावसाहेब वाकचौरे, शांताराम संगारे, सुरेश नवले, प्रमोद मंडलिक, नीलेश तळेकर, जालिंदर बोडके, बाळासाहेब आरोटे, अनिल कोळपकर आदिंसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.