'...तर आमदार साथ सोडून निघून जातील', अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 16:57 IST2023-03-07T16:56:33+5:302023-03-07T16:57:25+5:30
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून याबाबत भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

'...तर आमदार साथ सोडून निघून जातील', अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना सूचक इशारा
अहमदनगर
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून याबाबत भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याची टीका शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवार यांनी केली. एका अडत व्यापाऱ्यानं कांदा शेतकऱ्याला दोन रुपयाचा चेक दिला म्हणून यांनी त्याचा परवाना निलंबित केला. तू दोन रुपयाचा धनादेश दिला आणि आमची बदनामी झाली म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं, असं अजित पवार म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरुनही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच सुनावलं. प्रत्येक आमदाराला आज सांगितलं जात आहे की तुला मंत्री करणार, पण मंत्रिमंडळ विस्तार काही अद्याप केला गेलेला नाही. असं झालं तर आमदार निघून जातील, असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना दिला आहे.
"एका मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकत्व आहे. ४० ते ५० कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले जात आहेत. मुंबईत तर १७ कोटी रुपये जाहिरासाठी खर्च केले गेले. सगळीकडं यांच्याच जाहिराती आणि यांचेच फोटो. एक डबळी एसटी दिसली त्याखालीही या दोघांचेच फोटो. असे फोटो शोभतात तरी का?", असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला.
कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना आता अवकाळी पावसानं कापूर, हरभऱ्याचीही अशीच अवस्था झाली आहे. दिल्लीत कांद्याचे भाव कमी-जास्त झाले होते त्यामुळे दिल्लीचे सरकार गेले होते. जनतेनं मनात आणलं तर हेही सरकार पडू शकतं, असंही अजित पवार म्हणाले.