भरदिवसा चिमुरडीला पळवण्याचा प्रयत्न; तरुणांकडून भामट्यांची धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 17:08 IST2019-09-19T17:03:40+5:302019-09-19T17:08:31+5:30
गाडीतून पळण्याच्या प्रयत्नात असताना भामट्यांना पकडलं

भरदिवसा चिमुरडीला पळवण्याचा प्रयत्न; तरुणांकडून भामट्यांची धुलाई
अहमदनगर : दोन माहिन्याच्या चिमुरडीला पळवून नेणाऱ्या दोन तरुण व महिलांना नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिमुरडीला पळवणाऱ्या भामट्यांना परिसरातील तरुणांनी चांगलाच चोप दिला. ही घटना केडगाव रेल्वे स्टेशन परिसरात आज दुपारी एक वाजता घडली.
परभणीतले सतीष रमेश केरापली हे रोजंदारीच्या निमित्ताने नगर येथे येत असताना कोपरगाव येथील रेल्वे स्थानकावर दोन भामटे व एक महिला त्यांना भेटली. तुम्हाला एक हजार रुपयांप्रमाणे काम देतो. नगरमध्ये जाऊ, असे त्यांना सांगितले. रोजगाराच्या अपेक्षेने केरापली दाम्पत्य त्यांच्यासोबत नगरला आले. नगरमध्ये रेल्वे स्थानकावर आल्यानंतर हे जोडपे गप्पांच्या नादात असताना या तरूणांनी दोन महिन्याच्या चिमुरडीला उचलून चार चाकी वाहनातून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या जोडप्याने आरडाओरड केल्यामुळे गाडीतून पळण्याचा प्रयत्न केला.
केरापली दाम्पत्याने आरडाओरड केल्याने परिसरातील तरुणांनी मुलगी पळवणाऱ्या दोघांना व एक महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर तरुणांनी त्यांची चांगलीच धुलाई केली. याची माहिती मिळाल्यानंतर केडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मुलांना उचलून नेणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. परिसरातील सजग नागरिक आणि सतर्क पोलिसांमुळे मुलांच्या आई-वडिलांचाही जीव भांड्यात पडला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.