अहमदनगरच्या महापौरांनी मंजूर केला श्रीपाद छिंदमचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 14:54 IST2018-02-20T14:54:21+5:302018-02-20T14:54:26+5:30
अहमदनगरच्या महापौर सुरेखा कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा उपमहापौर श्रीपाद छिंदमचा राजीनामा मंजूर केला आहे.

अहमदनगरच्या महापौरांनी मंजूर केला श्रीपाद छिंदमचा राजीनामा
अहमदनगर - अहमदनगरच्या महापौर सुरेखा कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा उपमहापौर श्रीपाद छिंदमचा राजीनामा मंजूर केला आहे. श्रीपाद छिंदमचा राजीनामा आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. आयुक्तांकडून हा राजीनामा आता विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या उपमहापौर श्रीपाद छिंदम याची शुक्रवारी (16 फेब्रुवारी) भाजपामधून हकालपट्टी करण्यात आली. छिंदमनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने अहमदनगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. पोलिसांनी शुक्रवारी रात्री 9 वाजता छिंदमला अटक केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तोफखाना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छिंदम याला शनिवारी सकाळी 8 वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने छिंदमला 1 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. छिंदम याच्यावर सरकारी कामात अडथळा व धार्मिक भावना दुखवल्याचे तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातून हद्दपार करावे- खा. संभाजीराजे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणा-या श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. असल्या माणसांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी आता जरी माफी मागितली असली तरी नुसत्या माफीने खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिवरायांवर बोलण्याची छिंदमची पात्रता नाही -उदयनराजे
‘कोणत्याही व्यक्तीने बोलण्यापूर्वी आपली वैचारिक उंची, पात्रता पाहावी. आपण कोणाबद्दल बोलतोय, याचा विचार केला पाहिजे. श्रीपाद छिंदम याने महाराष्ट्राचे आराध्यदैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून कुप्रवृत्तीचे प्रदर्शन केले,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी श्रीपाद छिंदमच्या वक्तव्याचा समाचार घेतला.