पोहता येत नसतानाही पाण्यात उतरला; गाईला वाचवताना २५ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:33 IST2025-11-04T15:33:18+5:302025-11-04T15:33:33+5:30
अहिल्यानगरमध्ये गाईला वाचवण्याच्या नादात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोहता येत नसतानाही पाण्यात उतरला; गाईला वाचवताना २५ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू
Ahilyanagar Accident: अहिल्यानगरमध्ये गाईला वाचविण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पाझर तलावावर पाणी पित असताना गाईचा तोल जाऊन ती तलावात पडली. पायखुटी घातलेली असल्याने गाईला पोहता येत नव्हते आणि बाहेरही येता येत नव्हते. एक तरुण तिला वाचविण्यासाठी तलावात उतरला; परंतु, त्यालाही पोहता येत नसल्याने गायीसह २५ वर्षीय तरुणाचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना गंगापूर तालुक्यातील गुरुधानोरा शिवारात रविवारी सायंकाळी साडेसात उघडकीस आली.
राजू भानुदास भोसले (वय २५) असे मयत तरुणाचे नाव आहे. जनावरांना पाणी पाजण्यासाठी राजू पाझर तलावाकडे गेला होता. पाणी पिताना एका गाईचा तोल जाऊन ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी राजू पाण्यात उतरला. पण त्यालाही पोहताही येत नव्हते. त्यामुळे त्याच्यासह गायीचाही बुडून मृत्यू झाला. संध्याकाळी परतण्याची वेळ झाली तरी राजू घरी न आल्याने आई-वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. गुरुधानोरा शिवारात गाय पाझर तलाव मयत आढळली, तर राजूचे कपडे तलावाजवळ सापडले. त्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान वसीम पठाण, रितेश कस्तुरे, चालक रामदास राऊत यांनी साडेसात वाजेच्या सुमारास राजूचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. गंगापुरातील शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
राजू भोसले याचे आई-वडील मूळचे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सारोळा गावचे रहिवासी आहेत. दीड वर्षापूर्वी गंगापूर तालुक्यातील गुरुधानोरा येथे स्थायिक झाले. ते शेती करतात. राजूच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ आणि बहीण, असा परिवार आहे.
गाईला वाचवताना ५ तरुणांचा मृत्यू
दरम्यान, जून महिन्यात मध्य प्रदेशात गाईला वाचवताना पाच जणांचा मृत्यू झाला होता. विहिरीत पडलेल्या एका गाईच्या वासराला वाचवण्याच्या प्रयत्नात गावातीत पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला. बऱ्याच काळापासून वापरात नसलेल्या या विहिरीमध्ये विषारी वायू भरलेला होता. वासराला वाचवण्यासाठी गावातील तरुण पुढे आले. मात्र विहिरीमध्ये खाली उतरलेले तरुण एकापाठोपाठ एक बेशुद्ध पडत गेले. या दुर्घटनेत गावातील पाच तरुणांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली होती.