जुन्या वादातून भाच्याच्या मारहाणीत मामाचा मृत्यू; आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:39 IST2025-10-21T16:39:46+5:302025-10-21T16:39:46+5:30
जुन्या भांडणातूनच आरोपीकडून मामाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

जुन्या वादातून भाच्याच्या मारहाणीत मामाचा मृत्यू; आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी
Ahilyanagar Crime: जुन्या भांडणातून दारूच्या नशेत भाच्याने केलेल्या मारहाणीत चुलत मामाचा मृत्यू झाला. जवळा (ता. पारनेर) येथे शनिवारी ही घटना घडली. गोरख विठ्ठल गोरे (वय ६०, रा. जवळा (कुंभार गल्ली) असे मृताचे नाव आहे. याबाबत अनिल सुदाम गोरे (वय २८, रा. जवळा) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी भाऊसाहेब बबन दरेकर (वय ४४, रा. जवळा (कुंभार गल्ली) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पारनेर पोलिसांनी १८ ऑक्टोबर रोजी आरोपीस ताब्यात घेतले असून सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी भाऊसाहेब दरेकर व गोरख गोरे यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. जुन्या भांडणातूनच शनिवारी आरोपी भाऊसाहेब दरेकर याने मामा गोरख गोरे यांना लाथा-बुक्क्यांनी, तसेच काठीने मारहाण केली. फिर्यादी अनिल गोरे याने आरोपीच्या तावडीतून गोरे यांची सुटका केली. त्यांच्या घरी नेऊन सोडले. काही वेळाने आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन 'तुम्ही गोरखच्या सरपणाची तयारी ठेवा, मी त्याला मारून टाकणार आहे', अशी धमकी दिली. त्यावर गोरख मोरे घरातून बाहेर न आल्याने त्यांना पाहण्यासाठी फिर्यादी गेले असता, मृतावस्थेत ते आढळून आले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वीही जोरदार भांडणे
मामा-भाचे यांच्यात दोन दिवसांपूर्वीच जोरदार भांडणे झाली होती. नातेवाइकांनी त्यात मध्यस्थी केली होती. जुन्या भांडणाचा राग मनात धरून १८ ऑक्टोबर रोजी भाऊसाहेब दरेकर याने केलेल्या मारहाणीत सख्खा चुलत मामा गोरख गोरे यांचा मृत्यू झाला.
दारू पिऊन बाळाला घेण्यास विरोध; मारहाणीत वृद्धाचा मृत्यू
दारूच्या नशेत लहान बाळाला उचलू नको, असे सांगितल्याच्या रागातून दोघांनी वृद्धास मारहाण केली. त्यात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
काष्टी येथे १३ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. शिवाजी विठ्ठल वाघ (वय ७१, रा. काष्टी) असे मृताचे नाव आहे. याबाबत मृत शिवाजी वाघ यांचा मुलगा दीपक वाघ (३५) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू विठ्ठल वाघ व विशाल राजू वाघ (दोघे रा. वाघ वस्ती, काष्टी) अशी आरोपींची नावे आहेत. सोमवारी (दि. १३) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाघ वस्ती (काष्टी) येथे दारूच्या नशेत विशाल वाघ आला.
त्यावेळी त्याने लहान बाळाला उचलून घेण्याचा प्रयत्न केला असता, शिवाजी विठ्ठल वाघ (वय ७१) यांनी त्यास विरोध केला. 'तू दारू पिलेला आहेस, त्यामुळे लहान बाळाला घेऊ नकोस' असे त्याला सांगितले. मात्र, त्याचा राग आल्याने आरोपी विशाल वाघ व राजू वाघ यांनी लाकडी बांबूने शिवाजी वाघ यांना मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने शिवाजी वाघ यांना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तथापि, उपचारांदरम्यान शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) मृत्यू झाला.