पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; शेतातून घरी परतताना ग्रामस्थांमध्ये भीती
By सुदाम देशमुख | Updated: September 3, 2025 11:50 IST2025-09-03T11:46:46+5:302025-09-03T11:50:15+5:30
अहिल्यानगरमध्ये ४० वर्षीय मजुराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; शेतातून घरी परतताना ग्रामस्थांमध्ये भीती
अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील कळस येथील ४० वर्षीय मजुराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. पारनेर जुन्नर तालुक्याच्या हद्दीवर असणारा बेल्हे रानमळा परिसरात मंगळवारी रात्री ७ वाजता ही घटना घडली असून हल्लात ठार झालेला व्यक्ती गवंड्याच्या हाताखाली शेतमजूराचे काम करत होता.
मंगळवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारा कळस येथे बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील रानमळा रस्त्याला सुतार वस्तीजवळ घडली. आपले काम आटोपून गणेश गाडगे हे कळस गावाकडून रानमळ्याच्या रस्त्याने घरी येत असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. रात्री आठ वाजेपर्यंत गणेश घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गणेश गाडगे यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.या घटनेमुळे पुन्हा एकदा कळस परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कळस परिसरात उसाचे प्रमाण जास्त असल्याने बिबट्यांचा वावर नेहमीच असतो. यापूर्वीही जनावरांवर बिबट्यांचे हल्ले झाले आहेत, परंतु मानवी जीवितहानीची ही पहिलीच घटना आहे. या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, बिबट्यांचा धोका वाढल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणे धोकादायक बनले आहे. विशेषत: शेतातून घरी परतताना आणि रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना सतत भय वाटते.
स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त, पिंजरे लावणे किंवा रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे यासारख्या खबरदारीच्या उपायांची गरज व्यक्त केली जात आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला असून, परिसरात पिंजरे लावण्याचे नियोजन आहे. ग्रामस्थांनी रात्री एकट्याने बाहेर न पडण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे गणेश गाडगेंच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.